Mumbai Crime: नोकरी गेली! कर्मचाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवत महिला बॉसला लुटले
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : घणसोलीत राहणाऱ्या एका महिला व्यावसायिकांकडे पूर्वी कामाला असलेल्या एकाने या महिलेच्या घरामध्ये घुसून त्यांना बंदुकीचा धाक दाखवत आपल्या खात्यावर ३० हजार रुपये वळते केल्याची घटना घडली. या वेळी आरोपीने महिलेची ७५ हजारांची सोन्याची चैन घेऊन पलायन केले. अरुण कदम (वय ३८) असे या आरोपीचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार वृषाली दळवी (वय ५८) या घणसोली सेक्टर-९ मधील भूमी ऑस्कर इमारतीमध्ये राहण्यास असून त्यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. दळवी यांनी आरोपी अरुणला तीन वर्षांपूर्वी आपल्याकडे कारचालक म्हणून कामाला ठेवले होते. अरुण हा दळवी यांच्या घणसोली सेक्टर-१ मधील वृषाली किचन या हॉटेलमध्ये कुक म्हणून ही काम करत होता.
सहा महिन्यांपूर्वी दळवी यांनी आपले हॉटेल बंद केल्याने त्यांनी अरुण कदम याला कामावरून कमी केले होते. दरम्यान, बुधवारी (ता. १५) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वृषाली दळवी या आपल्या घरामध्ये एकट्याच असताना, उसनवारीने घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने अरुण हा त्यांच्या घरी गेला होता. यावेळी त्याने आपल्या सोबत आणलेल्या बंदुकीचा धाक दाखवून दळवी यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली.
या वेळी दळवी यांनी त्यांच्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने त्यांचे काहीएक ऐकून न घेता त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यामुळे वृषाली दळवी यांनी अरुण कदम याच्या बँक खात्यात ३० हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतरदेखील त्याने ५ लाख रुपये देण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे घाबरलेल्या वृषाली कदम यांनी आपली दीड तोळे वजनाची सोन्याची चैन काढून अरुणला दिली.
आरोपीचे पलायन
आरोपी अरुण कदमला घराच्या बाहेर जाण्यास सांगून दळवी या घराचा लोखंडी दरवाजा उघडत असताना खाली पडल्या. याच वेळी दोन मुली लिफ्टमधून बाहेर आल्याने दळवी यांनी त्यांच्याकडे मदतीची याचना केली. त्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीला घडल्या प्रकाराची माहिती देऊन रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.