ठाणे थोडक्यात
कल्याणमध्ये रोटरी स्पोर्ट्स सर्कलचे अनावरण
कल्याण (वार्ताहर) : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण कायमच नावीन्यपूर्ण समाजोपयोगी प्रकल्प कल्याण शहर व परिसरात राबवत असते. शहर सुशोभीकरणाबरोबरच त्यातून एक संदेश दिला जावा, तसेच यादृष्टीने नागरिकांमध्ये खेळ आणि फिटनेस याचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे माजी अध्यक्ष कैलास देशपांडे व जनसंपर्क अधिकारी अॅड. निखिल बुधकर यांच्या संकल्पनेतून गंधारे पुलाजवळील सर्कलचे रूपांतर स्पोर्ट्स सर्कलमध्ये केले आहे. हे काम पूर्णत्वास येण्यासाठी दीपक चौधरी व विद्यमान अध्यक्ष बिजु उन्नीथन यांची मोलाची साथ लाभली. या प्रकल्पाचा अनावरण व लोकार्पण सोहळा पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या सोहळ्याला रोटरी जिल्हा ३१४२चे प्रांतपाल दिनेश मेहता, मूळ मालक भंडारी परिवार व कल्याणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. टाकाऊ लोखंड वापरून चार वेगवेगळे खेळ दर्शवणारी अत्यंत सुबक शिल्पे सुप्रसिद्ध शिल्पकार सिद्धार्थ साठे यांनी घडवली आहेत. यात धावपटू, योगपटू, सायकलपटू व अपंग तिरंदाज अशा चार खेळाडूंची प्रातिनिधिक शिल्पे आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी याबद्दल क्लबचे व साठे यांचे विशेष कौतुक केले. तसेच, त्यांनी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणची प्रशंसा केली.
...........................
मुरबाडच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अंबरनाथ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील स्पंदन फाउंडेशन संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास पेटी, पुस्तकांचा संच देण्यात आला. अंबरनाथमधील डॉ. राहुल चौधरी आणि सहकारी स्पंदन संस्थेच्या माध्यमातून २०१७ पासून दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा उपक्रम राबवत आहेत. मुरबाड तालुक्यातील शिरवली, तोंडली, मानिवली पाडा, मानिवली, वडाची वाडी, तळ्याची वाडी, चिल्लार वाडी, खोंड्याची वाडी, रावगाव, काकडपाडा, न्हावे, सासणे, खोकाटे वाडी, टेपवाडी, काचकोली, चिमणीची वाडी, मोहघर, खामघर, वेहेरे आणि देवराळ वाडी येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. शैक्षणिक साहित्याच्या वाटपाव्यतिरिक्त स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा इमारत दुरुस्ती, गरजू कुटुंबांना धान्य वाटप आदी उपक्रम अन्य काही संस्थांच्या सहकार्याने वर्षभर राबवले जातात.
....................
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी वैशाली चंदे
पडघा (बातमीदार) : जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीच्या माजी सभापती वैशाली चंदे याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सरपंच ते जिल्हा परिषद सभापती असा राजकीय प्रवास करणाऱ्या वैशाली चंदे यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. तसेच, गोरगरीब महिलांना विविध स्तरावर मदत केली आहे. त्यांच्या या भरीव समाजसेवी कार्याची दखल घेत माझी लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. निवड होताच त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहचावा, यासाठी शुक्रवारी (ता. १६) शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख विष्णु चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली चंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भिवंडी तालुक्यातील सोर गावात महिला व मुलींचे फॉर्म भरण्यासाठी शिबिर आयोजित केले होते. यावेळी महिलांना योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवा भुते, माधुरी दिनकर, अक्षय भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले.
............................
शिवसेनेच्या वतीने ‘हात तुमचा मेहंदी आमची’ उपक्रम
कल्याण (वार्ताहर) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भगवा सप्ताहानिमित्त महिलांसाठी ‘हात तुमचा मेहंदी आमची’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधनानिमित्त शिवसेना कल्याण पूर्व व महिला आघाडीच्या वतीने माता-भगिनींसाठी कल्याण पूर्वेतील हनुमान नगर येथे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी परिसरातील महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली. उल्हासनगरच्या माजी नगरसेविका वसुंधरा बोडारे, शहर संघटिका कल्याण पूर्व मीना माळवे, उपशहर संघटक सुनीता ढोले, उपविभाग संघटिका आश्लेषा पवार, योगिता गुजर, अमृता कदम, संध्या पंचांगे, रसिका गवस, सुमित्रा चौरे, स्नेहा चांदे, नलिनी कदम, संध्या कांबळे, शाखाप्रमुख सूर्यकांत मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्रावण महिन्यात अनेक सणवार असतात. त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. या सणाला महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जातात. सण साजरे करताना महिला आपल्या शृंगारावरदेखील विशेष लक्ष देतात. त्यातील एक भाग म्हणजे हातावर मेहंदी काढणे; मात्र सध्या महागाईमुळे बाहेर जाऊन मेहंदी काढणे, सर्वसामान्य महिलांना शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेत शिवसेनेच्या वतीने हा मेहंदी काढण्याचा उपक्रम राबविला असल्याची माहिती कल्याण पूर्व शहर संघटिका मीना माळवे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.