badlapur school crime incident
badlapur school crime incidentesakal

Badlapur School Crime: एकीकडे लाडकी बहीण योजनेचा जल्लोष पण दुसरीकडे.. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Thane Crime against Women: गेल्या दीड वर्षात ५३१ अत्याचाराच्या, तर ९२२ विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बस थांबा, रिक्षा स्टॅन्डपासून ते रुग्णालय, शाळेपर्यंत कुठेच सुरक्षित वातावरण नसल्यामुळे महिलांमध्ये भीतीची भावनाही वाढू लागली आहे.
Published on

डोंबिवली, ता. २० : लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर तिचे श्रेय घेण्यासाठी राजकीय मंडळींमध्ये चढाओढ लागलेली असतानाच या लाडक्या बहिणींसह तिची लेकही सुरक्षित नाही. ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरामध्ये दररोज एका महिलेवर बलात्कार होत असल्याचा गुन्हा नोंद होत आहे. विनयभंगाच्या घटनाही त्याच संख्येने आहेत. गेल्या दीड वर्षात ५३१ अत्याचाराच्या, तर ९२२ विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बस थांबा, रिक्षा स्टॅन्डपासून ते रुग्णालय, शाळेपर्यंत कुठेच सुरक्षित वातावरण नसल्यामुळे महिलांमध्ये भीतीची भावनाही वाढू लागली आहे.

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याने जल्लोष साजरा करण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेचा जल्लोष होत असतानाच दुसरीकडे याच लाडक्या बहिणी, तसेच त्यांच्या मुली मात्र सुरक्षित नसल्याचे वातावरण ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

गेल्या दीड वर्षांत महिन्याला अत्याचार आणि विनयभंग गुन्ह्यांच्या नोंदीची आकडेवारी ही १०० च्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वी डायघर येथील मंदिरात महिलेवर पुजारी व त्याच्या साथीदारांनी अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली. अंबरनाथ शहरात वडिलांच्या ७५ वर्षीय मित्राकडून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार, बदलापूर येथे एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात लाडकी बहीण आणि तिच्या लेकी सुरक्षित नसल्याचे दिसून येते.

बदलापुरात उद्रेक

बदलापूर येथे एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुरडींवर शाळेतील शिपायाने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी अत्याचार केल्याची घटना स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधीच उघडकीस आली आहे. चिमुरडीने आईला आपल्याला लघवीच्या ठिकाणी त्रास होत आहे, असे सांगितले. मुलीच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले असता आपल्या मुलीसोबत काय झाले आहे, हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. या मुलीसोबतच आणखी एका चिमुरडीसोबत हीच घटना घडल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर बदलापूर शहर पेटून उठले आहे.

महिलेच्या असहायतेचा फायदा

शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिर परिसरात ३० वर्षीय अक्षता म्हात्रेवर सामूहिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना ९ जुलैला उघडकीस आली. सासरच्या मंडळींसोबत वाद झाल्यामुळे ती घरातून निघून मंदिरात जाऊन बसली होती. तिच्या या असहायतेचा फायदा मंदिरातील पुजारी आणि त्यांच्या मित्रांनी घेत, जेवणातून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करत तिची हत्या केली होती.

पित्यासमान व्यक्तीकडून अत्याचार

अंबरनाथ पश्चिमेत एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांच्या ७५ वर्षीय मित्राकडूनच अत्याचार झाल्याची घटना समोर आली. घरात मुलगी आणि तिची आई दोघेच राहत असल्याचा फायदा घेत संशयित आरोपीने मुलीची आई कामावर गेल्याचा बेत साधत सामान घेण्याच्या निमित्ताने घरात प्रवेश करून या मुलीवर बलात्कार केला. आईला याविषयी काही सांगितल्यास आईला जीवे ठार मारण्याची धमकी या नराधमाने मुलीला दिली होती, मात्र मुलीने आई कामावरून परतताच तिला याविषयी माहिती दिली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात निसार ठाणगे याच्याविरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

तरुणीची चाकूने हत्या

उरण येथे राहणारी २० वर्षीय तरुणी यशस्वी शिंदेची २५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दाऊद शेख या तरुणाने तिला भेटायला बोलावले. त्या वेळी त्यांच्यात वाद होऊन दाऊदने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली.

जुलैपर्यंतच्या घटना

२०२३ मध्ये जानेवारी ते जुलैपर्यंत ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरामध्ये अत्याचाराच्या २११ घटनांची नोंद झाली होती, तर २०२४ मध्ये याच कालावधीदरम्यान १७० गुन्ह्यांची पोलिस ठाण्यांमध्ये नोंद आहे, तसेच २०२३ या कालावधीमध्ये विनयभंगाचे ३८४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०२४ मध्ये हे प्रमाण २९७ होते.

जुलै २०२४ पर्यंतचे गुन्हे

अत्याचार १७०
विनयभंग २९७

२०२३ मधील गुन्हे

अत्याचार ३६१
विनयभंग ६२५

२०२४ मधील गुन्ह्यांच्या नोंदी

महिना अत्याचार विनयभंग
जानेवारी २४ ४१
मार्च ३५ ६५
एप्रिल ३६ ४५
मे २५ ५८
जून २५ ५१
जुलै २५ ३७

२०२३ मधील गुन्ह्यांच्या नोंदी

महिना अत्याचार विनयभंग
जानेवारी ३३ ५४
फेब्रुवारी ३० ५०
मार्च ३६ ५६
एप्रिल २६ ४५
मे ३० ६६
जून ३१ ६६
जुलै २५ ४७
ऑगस्ट ३४ ४६
सप्टेंबर २५ ५०
ऑक्टोबर ४१ ५४
नोव्हेंबर २१ ४४
डिसेंबर २९ ४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...