Kalyan Shilphata Traffic: ट्रॅफिक जाममुळे चक्क शाळेला सुट्टी? दुसऱ्यांदा ओढवली विद्यानिकेतनवर नामुष्की!
Kalyan Shilphata Traffic Jam Vidyaniketan School Holiday
डोंबिवली, ता. २९ : कल्याण-शिळ मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळेच्या बस कोंडीत तासनतास अडकून पडत आहेत. मुले शाळेत वेळेवर पोहोचत नसल्याने शाळा प्रशासनावर अनियोजित सुट्टी जाहीर करण्याची वेळ येत आहे. बुधवारी (ता. २८) विद्यानिकेतन शाळेची बस कोंडीत अडकल्याने दुसऱ्यांदा शाळेला सुट्टी देण्याची वेळ ओढवली.
कल्याण-शिळ रोडवरील कोंडीची समस्या ही नित्याचीच झाली आहे. मेट्रोच्या कामामुळे यात आणखी भर पडली आहे. कल्याण-शिळ रोडवरील खड्डे चालकांना त्रासदायक ठरत असल्याने येथे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. चार लेनचे काम पूर्ण झाल्याने आता मुंबई, ठाण्याला जाण्याचा मार्ग सुखकर होईल, अशी आशा निर्माण झाली होती; मात्र या ठिकाणी एमएमआरडीएकडून मेट्रोचे खांब उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे नव्याने तयार केलेला सिमेंटचा रस्ता उखडला आहे, तसेच कामाच्या ठिकाणी मोठ्या मशिनरी असल्याने पत्रे उभारले आहेत. परिणामी मार्गावरील दोन्ही बाजूने केवळ सिंगल लेन सुरू आहे.
अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाणेला जाणाऱ्या नागरिकांना केवळ हाच रस्ता मार्ग उपलब्ध आहे. शिवाय या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहात असल्याने यावर वाहनांची वर्दळ जास्त असते. या कोंडीचा फटका केवळ चाकरमान्यांनाच नाही, तर शाळेच्या विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. या मार्गावर अनेक मोठमोठ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली आदी परिसरातून विद्यार्थी येत असतात. वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या बस कोंडीत तासनतास अडकून पडतात. दररोज शाळेच्या बस सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिरा शाळेत पोहोचत आहेत.
काही ठिकाणी सिंगल लेन सुरू असल्यामुळे वाहने कशीही आडवी तिडवी चालवल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोंडी होते. वाहतूक पोलिस येथे नसतात. त्याचप्रमाणे मानपाडा चौकात सिग्नल बंद असल्याने चारही बाजूने वाहने येतात. काही कंपनीच्या खासगी बस या रस्त्यात कोठेही उभ्या केल्या जातात. यामुळे अनेकदा वाहनांना अडथळा निर्माण होतो. रुणवाल गार्डन समोरील ओपनिंग बंद केल्यामुळे संदप, दिवा तसेच आतील हौसिंग सोसायटीतील वाहने चुकीच्या दिशेने येतात. त्यामुळे येथे वाहतूक पोलिस कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. तरच यावर काही प्रमाणात तोडगा निघू शकतो.
- विवेक पंडित, संस्थापक अध्यक्ष, विद्यानिकेतन शाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.