तीन वेळा नोटीस बजावूनही दिरंगाई

तीन वेळा नोटीस बजावूनही दिरंगाई

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : मुंबई-गोवा महामार्गावर चेतक इंटरप्राइजेस कंत्राट कंपनीच्या वतीने इंदापूर-वडपाले टप्प्याचे डिसेंबर २०१७ पासून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावयाचे होते. मात्र, त्यानंतर मुदतवाढ मिळूनही ठेकेदारांकडून या कालावधीत फक्त ४.६ टक्के या वेगानेच होऊ शकले. या पार्श्वभूमीवर कंत्राट यास महामार्ग प्राधिकरणाकडून तीन वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
इंदापूर-वडपाले टप्प्यातील ९१.८० टक्के भूसंपादन करून हे काम कंपनीला देण्यात आले होते. कंत्राटदाराकडून करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जा तपासून त्याने कामाचा योग्य दर्जा न राखता निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत वेळोवेळी आढळून आले होते. केंद्र सरकारमार्फत या कामाच्या गुणवत्ता नियंत्रणावर देखरेख करण्यासाठी मे. ब्लूम एल.एल.सी., यू.एस.ए. शाखा महाड यांच्यामार्फत एन.सी.आर. (नॉन कन्फर्मेशन रिपोर्ट) देण्यात आलेले आहे. चेतक इंटरप्राइजेसने कामामध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही.

चौदपरीकरणाच्या कामातील दिरंगाई आणि निकृष्ट कामांमुळे चार वर्षांत ७० मोटर अपघातांत ९७ जणांना जीव गमवावा लागला आहे. दोनशेहून अधिक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघातात नागरिकांना जीव गमावूनही हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने येथील नागरिकांत कमालीचा असंतोष पसरला आहे. ही कारवाई एकाच लहानशा टप्प्यातील कामाच्या कंत्राटदारावर करण्यात आली आहे. इतर टप्प्यांतील कंत्राटदारांवरही अशाच प्रकारे कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
----
कंत्राटदाराच्या कामातील दोष
- वळण घेऊन महामार्गाच्या एकाच मार्गिकेवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांमुळे धोकादायक स्थिती निर्माण होते.
- ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही, त्या ठिकाणी रस्त्याचा भाग उखडून जागोजागी खड्डे पडल्याने अपघात होत आहेत.
- काही ठिकाणी नव्याने केलेला रस्ता आणि जुना रस्ता यातील काही भाग खोदून ठेवून ते अपूर्ण आहे.
- सुरक्षा उपाययोजनांचा अभाव.
- काम अर्धवट सोडून दिल्याने रस्त्याची दुरवस्था.
- अपघात टाळण्यासाठी थर्मोप्लॅस्टिक पेंट (पांढऱ्या पट्ट्या), कॅट आइज, डेलीनेटर, वाहनचालकांच्या माहितीसाठीचे माहिती फलक न लावणे.
----
इंदापूर ते वडपाले या टप्प्याचे काम करणारे कंत्राटदार मे. चेतक एंटरप्राइजेस यांच्याविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. निकृष्ट आणि अर्धवट काम अपघातास कारणीभूत ठरत असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे. याप्रकरणी प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांना अटक करण्यात आली आहे.
- सोमनाथ घार्गे, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.