बोर्डीमध्ये २५ लाखांच्या 
कामाच्या देयकांचा गोंधळ

बोर्डीमध्ये २५ लाखांच्या कामाच्या देयकांचा गोंधळ

Published on

पालघर, ता. २९ (बातमीदार) : बोर्डी ग्रामपंचायतीमध्ये २०१८-२३ दरम्यान झालेल्या २५ लाखांच्या वादग्रस्त कामांच्या देयकावरून वाद सुरू आहे. या कामांसंदर्भात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसताना तत्कालीन उपसरपंचाच्या नातेवाईक असणाऱ्या कंत्राटदाराच्या प्रलंबित देयकांबाबत डहाणू पंचायत समिती व जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला पत्र पाठवले आहे.

बोर्डी ग्रामपंचायतीने २०१८-२३ दरम्यान तत्कालीन उपसरपंचाच्या मुलाला १५ वित्त आयोगाची १६ कामे दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र यापैकी आठ कामांच्या बी-१ निविदा प्रक्रिया त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत, तसेच प्रशासकांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर कंपनीकडून प्रलंबित देयकांचा तपशील देऊन पैशाची मागणी करण्यात आली होती, मात्र कामाच्या दर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याने, तसेच कागदपत्रांची पूर्तता नसल्याने या कामांची देयके देण्यात आली नव्हती.

कंत्राटदाराने पाठविलेल्या नोटिसीला ग्रामपंचायतीतर्फे उत्तर देताना निविदा प्रक्रिया संदर्भात पुरविण्यात आलेल्या कागदपत्रांवर आवश्यक अधिकारी वर्गाच्या सह्या नसल्याचे अनेक कागदपत्रे कोरी व अपूर्ण, तसेच करारनामा झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यासाठी आवश्यक स्टॅम्प पेपर करारनामा झाल्यानंतर खरेदी केल्याने दाखवून देण्यात आले. एकाच दिवशी कंत्राटदाराला १५ ते १७ कार्यादेश दिल्याने या प्रक्रियेची चौकशी करण्याचे ग्रामपंचायतीने योजले आहे, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. माजी उपसरपंचाच्या तक्रारीवरून डहाणू पंचायत समितीकडून बोर्डी सरपंचांना कार्यालयात कामात दिरंगाई असल्याचे कारण दाखवून नोटीस बजावली होती.

बोर्डी ग्रामपंचायतीचा कारभार नियमानुसार चालत आहे. कायदेशीर नोटिसा अथवा अपात्रतेच्या कारवाईच्या पत्राद्वारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी बोगस बिले मंजूर करणार नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकल चौकशी करावी, यासाठी मागणी केली आहे.
- श्याम दुबळा, सरपंच, बोर्डी ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.