१९३७ मध्ये रतन टाटा यांचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. ते अवघ्या १० वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर आजीने त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे या परिस्थितीमुळेच त्यांच्यात विनम्रता आणि उच्च कौटुंबिक मूल्ये खोलवर रुजली. आलिशान घरात त्यांचे आयुष्य गेले. कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी आर्किटेक्चर अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, तर हार्वर्डमधून ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम असे उच्च शिक्षण घेतले होते. यानंतर आयबीएमने देऊ केलेली नोकरी त्यांनी नाकारली होती.
त्यांनी १९६२ मध्ये टेल्कोच्या (आताची टाटा मोटर्स) दुकानात नोकरी केली. टाटांनी आपली कारकीर्द तळापासून सुरू केली. टाटा समूहातील विविध समूहांमध्ये त्यांनी काम केले. अखेर १९७१ मध्ये त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या (नेल्को) संचालकपदी निवड झाली. यासाठी संचालकपदी पोहोचण्यासाठी त्यांना ९ वर्षांचा कालावधी लागला. हे काम करत असताना त्यांनी कोणतीही लाज बाळगली नाही. कठीण परिश्रमांपासून त्यांनी कधीही पळ काढला नाही. वचनबद्धता आणि समर्पण भावनेने त्यांनी तळागाळातील वास्तव आणि सर्वसामान्यांच्या गरजांमधील बारकावे त्यांनी समजून घेतले. त्यातूनच त्यांनी आपले कौशल्य विकसित करून विविध उद्योगांतील अमूल्य अनुभव मिळवला.
जोखीम पत्करणारे व्यक्तिमत्त्व
देशभरात सर्वत्र असणारा ब्रँड हा टाटा आहे. टाटांचे उत्पादन वापरले नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. टाटा सॉल्ट ते टाटा मोटर्स असा हा विस्तार आहे. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. अनेक अडथळे असूनही रतन टाटा यांनी प्रसंगी जोखीम उचलण्याचे धैर्य दाखवले आणि मोठ्या अधिग्रहणाचे व्यवहार आपल्या बाजूने वळवले. रतन टाटा यांनी मार्च १९९१ मध्ये टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत टाटा समूहाचा महसूल अनेक पटीने वाढला. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा या समूहाची उलाढाल १० कोटी रुपये होती. २०११-१२ मध्ये ही उलाढाल १००.०९ अब्ज डॉलरवर पोहोचली.
२८ डिसेंबर २०१२ मध्ये ते निवृत्त झाले. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था उदारमतवादी धोरणाकडे वाटचाल करत होती. टाटा समूहाच्या विकास आणि जागतिकीकरणाच्या मोहिमेने रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली वेग घेतला. त्याचाच भाग म्हणून नवे सहस्रक टाटांनी केलेल्या बड्या अधिग्रहणाच्या व्यवहारांचा साक्षीदार बनला. यामध्ये टेटली ४३.३० कोटी डॉलर, कोरस ११.३ अब्ज डॉलर, जग्वार अँड लँड रोव्हर २.३ अब्ज डॉलर आणि ब्रुनर माँड, जनरल केमिकल इंडस्ट्रीअल प्रोडक्ट्स आणि डेऊ यांची १०.२० कोटी डॉलरना केलेल्या खेरदीचा समावेश आहे. टाटांनी दाखवलेल्या या धाडसामुळेच जागतिकीकरणाच्या पटावर टाटा समूहाच्या पाऊलखुणा उमटू शकल्या. या जोरावर टाटा समूहाने १०० हून अधिक देशांमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले. यामुळे भारतीय उद्योगाला मोठी चालना मिळाली. कंपनीने जगभरातील हॉटेल, केमिकल कंपन्या, दूरसंपर्क कंपन्या आणि ऊर्जा पुरवठा कंपन्या खरेदी केल्या.
एअर इंडियाला पुन्हा टाटा ग्रुपमध्ये आणणे हे त्यांनी आपल्या पूर्वजांच्या सन्मानासाठी उचललेले पाऊल म्हणून पाहिले जाते. त्यांचे काका आणि मेंटॉर असलेल्या जहांगीर रतनजी दादाभॉय यांनी १९३२ मध्ये ही कंपनी स्थापन केली होती. ‘जोखीम न घेणे हीच मोठी जोखीम आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात जोखीम न घेण्याची एकमेव रणनीती ही अपयशाची खात्री देते,’ हे रतन टाटा यांचे मत त्यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करते.
बाजारपेठेची अचूक जाण
रतन टाटा यांनी लोकांच्या गरजा आणि दैनंदिन जीवनाच्या निरीक्षणातून बाजारपेठेची नस अचूक पकडली होती. त्यातूनच जगातील सर्वात स्वस्त कार असलेल्या टाटा नॅनोचा जन्म झाला. टाटा इंडिकालाही विसरता येणार नाही. या कारच्या माध्यमातून सर्वप्रथम भारतीय कार देण्याचा प्रयत्न केला. टाटा नॅनो या प्रकल्पातून सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणाचा उद्देश होता.
---
आयुष्यभर देणारे हात
रतन टाटा हे कसलेले उद्योगपती होते, मात्र त्यांचे उद्दिष्ट केवळ नफा मिळवणे हे कधीच नव्हते. सामाजिक दायित्व आणि शाश्वत विकासासाठी ते आयुष्यभर वचनबद्ध राहिले. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट २०२१ मध्ये त्यांचे स्थान ४३३ वे होते. ते उदार दानशूर व्यक्तिमत्त्व असल्याचेच यामागे कारण असावे. देशातील सर्वात मोठी चॅरिटेबल संस्था असलेल्या टाटा ट्रस्टने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी तंत्रज्ञान केंद्र उभारली आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण, ग्रामीण विकासावर आधारित प्रकल्पांना मदत केली जाते. कोविडसारख्या महामारीशी जग लढत असताना त्यांनी ५०० कोटींची मदत करून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले.
रतन टाटा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेला कार्यकारी केंद्रे उभारण्यासाठी पाच कोटी डॉलरची देणगी दिली. टाटा ट्रस्टने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि विविध आयआयएम कॅम्पससारख्या अनेक शैक्षणिक संस्थांना वित्तपुरवठा केला आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी यात बळी गेलेल्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ‘ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्ट’ची स्थापना केली.
नवउद्यमांना पाठबळ
रतन टाटा यांनी ५० हून अधिक स्टार्टअपना (नवउद्यम) आतापर्यंत मदतीचा हात दिला आहे. लेन्सकार्ट, डिजिटल पेमेंट ब्रँड पेटीएम, इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफाॅर्म अपस्टॉक्स यांसारख्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांचे श्वानप्रेमही सर्वश्रुत आहे. टाटा सन्सचे बॉम्बे हाउस हे अनेक भटक्या श्वानांसाठी आश्रयस्थान बनले. या श्वानांचा टाटा समूहामार्फत सांभाळ केला जातो. या श्वानप्रेमातूनच शंतनू नायडू यांचा टाटा यांच्याशी संपर्क आला. ‘मोटोपॉज’ या सामाजिक उद्यमासाठी निधीच्या अनुषंगाने हा संपर्क आला. ही संस्था रस्त्यावरील श्वानांना ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’चा पुरवठा करते.
सरकारकडून दखल
भारतीय उद्योग आणि समाजासाठी रतन टाटा यांनी केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली. केंद्र सरकारने २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. याशिवाय देश-परदेशातील अनेक विद्यापीठांनीही त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केले आहे.
सायरस मिस्त्री यांच्याशी संघर्ष
रतन टाटा यांना निवृत्तीनंतर सायरस मिस्त्री यांच्याशी ‘बोर्डरूम बॅटल’ला सामोरे जावे लागले. २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर टाटांनी हंगामी अध्यक्ष म्हणून समूहाची पुन्हा धुरा हाती घेतली. त्यानंतर समूहाची घडी पुन्हा सावरण्यासाठी २०१७ मध्ये टीसीएसचे अध्यक्ष राहिलेल्या एन. चंद्रशेखरन यांच्या हाती जबाबदारी सोपवून त्यांनी मानद अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी बसलेले एन. चंद्रशेखरन हे टाटा कुटुंबाबाहेरील पहिले अध्यक्ष ठरले.
----
दोनदा झाले अध्यक्ष
- जमशेतजी टाटा (१८६८-१९०४)
- सर दोराबजी टाटा (१९०४-१९३२)
- सर नवरोजी सकलाटवाला (१९३२-१९३८)
- जे.आर.डी. टाटा (१९३८-१९९१)
- रतन टाटा (१९९१-२०१२)
- सायरस मिस्त्री (२०१२-२०१६)
- रतन टाटा (२०१६-२०१७)
- नटराजन चंद्रशेखरन (२०१७ पासून)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.