Kalva Mumbra: कळवा-मुंब्य्रात आव्हाड पुन्हा मारणार बाजी? की दादा देणार धोबी पछाड?
राहुल क्षीरसागर
Latest Thane News: मागील पंधरा वर्षे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा मजबूत गड राहिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विजयाची हॅट्ट्रीक केल्यानंतर या वेळी ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कळव्यात भूमिपुत्र, मराठी, उत्तर भारतीय वस्ती; तर मुंब्रा बहुतांश मुस्लिमबहुल आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाची मते निर्णायक ठरतात. धार्मिक मुद्दा कितीही आणला, तरी १५ वर्षांत या मतदारसंघाचा झालेला कायापालट नाकारता येत नाही.
त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देणे कठीण आहे; मात्र या वेळी राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. दोन्ही गटांचे उमेदवार किंबहुना गुरू-शिष्य निवडणूक लढणार असल्याची शक्यता असल्याने चुरस वाढणार आहे. याशिवाय मुंब्रा विकास आघाडीही मैदानात आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी, गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन गटांत विभागली आहे.
यात जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी असलेली निष्ठा ठेवून त्यांचा हात धरला आहे. एकेकाळी आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले माजी खासदार आनंद परांजपे आणि माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी त्यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाड यांना घेरण्यासाठी अजित पवार गटाकडून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या मतदारसंघातून नजीब मुल्ला हे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत असल्याने त्यांनी मतदारांची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे. कळवा-मुंब्रा येथील विकास निधी आणण्यापासून ते त्या निधीतून नगरसेवकांच्या माध्यमातून कामाचे वाटप करणे, उपक्रम राबवण्यात मुल्ला यांनी बाजी मारली आहे.
या माध्यमातून मुल्ला हे आव्हाड यांच्या विरोधात आव्हान उभे करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे १५ वर्षांत या भागाचा विकासच झाला नसल्याचा दावा केला जात आहे. याला उत्तर म्हणून आव्हाड यांनी बॅनरबाजीतून विकासकामांचा पाढा वाचला आहे. त्यामुळे आता मुंब्रा-कळवा विधानसभा निवडणुकीत यंदा आव्हाड विरुद्ध मुल्ला असाच सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
आव्हाडांचा वरचष्मा
मुंब्रा-कळवा हा मतदारसंघ मुस्लिम बहुलवस्तीचा मानला जात आहे. परंतु, या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादीतून जितेंद्र आव्हाड हे निवडून गेले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्येही त्यांचा वरचष्मा दिसून आला होता. मागील निवडणुकीचा विचार केल्यास या मतदारसंघातून आव्हाड यांना एक लाख ९ हजार २८३ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांना अवघी ३३ हजार ६४४ मते मिळाली होती. आव्हाड यांचा ७५ हजार ६३९ मतांनी विजय झाला होता.
मुंब्य्रासाठी मुस्लिम उमेदवार का असू नये?
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता मुंब्य्रातील काही माजी नगरसेवक मुल्ला यांच्या छावणीत जाऊन बसले आहेत. त्यातही १५ वर्षे आव्हाडांना संधी दिली. आता आमच्या मुंब्य्रासाठी मुस्लिम उमेदवार का असू नये? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या वेळी प्रचाराचा हाच मुद्दा असेल, याची खबरदारी मुल्ला समर्थकांकडून घेतली जात आहे. दुसरीकडे विकास हेच आपले काम असल्याने त्यातूनच मते मागणार असल्याचे आव्हाड सांगत आहेत. त्यातही आव्हाडांना निधीसाठी झगडावे लागत असताना मुल्ला यांनी मात्र या ठिकाणी कोट्यवधींचा निधी आणून माजी नगरसेवकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.
शिंदे सेनेची खेळी कोणाच्या पथ्यावर?
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आव्हाड आणि शिंदे यांच्यात छुपी मदत ही ठरलेली दिसून आली होती. लोकसभेला डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत करायची त्या बदल्यात आव्हाड यांच्याविरोधात कमकुवत उमेदवार द्यायचा, अशी काहीशी रणनिती निवडणुकीत दिसून आली. मात्र, शिंदे आणि आव्हाड यांच्यात वाढलेला दुरावा; तसेच अजित पवार गटाचे आवाहन असे असताना शिंदे सेनेची ती खेळी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.