उमेदवारांचा डिजिटल प्रचार!

उमेदवारांचा डिजिटल प्रचार!

Published on

उमेदवारांचा डिजिटल प्रचार!
रील्स स्टार, यूट्युबर्सला मागणी वाढली; सोशल मीडियाद्वारे लाखोंची कमाई
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्यातील विधासभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून  प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर जोर देत आहेत. त्यातच लाखो फॉलोअर्स असलेल्या  रील्स स्टार आणि यूट्युबर्सना डिमांड आली आहे. त्‍यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्‍यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगाराची संधी मिळणार आहे.
काही वर्षांपूर्वी  निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार रस्त्यांवर, गल्लोगल्ली कार, रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये लाऊडस्पीकर लावून, आपले निवडणूक चिन्ह असलेले झेंडे घेऊन प्रचार करायचे, मात्र सोशल मीडियाचा वापर वाढल्‍यापासून डिजिटल प्रचाराला जोर आला आहे. आता प्रत्येक पक्ष आणि उमेदवारही आपापल्या स्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार करताना दिसतो. व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टाग्राम, यूट्युब, एक्स, व्हॉट्सॲपचा प्रचारासाठी वापर वाढला आहे. महामुंबईत अजूनही लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचाराचे नियोजन करत आहेत. प्रचारसभा, रॅली, रोड शो यामार्फत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे.
यंदा प्रचाराची लढाई ही सोशल मीडियावर प्रामुख्याने लढवली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगले फॉलोअर्स असणारे तरुण या वेळी लखपती होणार आहेत. एक लाखाच्यावर फॉलोअर्स असणारे शेकडो फेसबुक, इन्स्टाग्राम पेज, यूट्युब चॅनेल विकत घेण्याचा सपाटा प्रमुख राजकीय पक्षांनी लावला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम पेज, यूट्युब चॅनेलचे किती फॉलोअर्स, त्याचा रिच याचे मूल्यमापन करून मानधन ठरते. सध्या प्रति फॉलोअर तीन ते चार रुपये हे दर आहेत. सरासरी प्रति फेसबुक, इन्स्टाग्राम पेज एक ते दोन लाख रुपयाला खरेदी केले जात आहेत. राज्यात हजारोंच्या संख्येने हे पेज विकले गेले आहे. हे पेज विकत घेऊन त्या माध्यमातून टार्गेटेड मतदारांना प्रभावित करण्याचे काम पक्ष करत आहेत.

‘रील्स स्टार’ची चलती
निवडणुकीत रील्स स्टार यांना तुफान मागणी आहे. अनेक लोकप्रिय रील्स स्टारना प्रचारासाठी रील्स बनवण्याचे काम पक्षांकडून दिले जात आहे. बड्या रील्स स्टारची किंमत जास्त आहे; मात्र स्थानिक रील्स स्टारलादेखील चांगला मोबदला मिळत आहे. प्रचाराचे रील्स तयार करून ते पोस्ट करणे, यासाठी रील्स स्टार तीन ते चार लाख रुपयांपर्यंत मानधन वसूल करत आहेत. त्यामुळे यंदा स्थानिक रील्स स्टारही मालामाल होत असल्याचे चित्र आहे.

 पोस्ट करा, पैसै मिळवा
सोशल मीडियावर चांगले लिखाण करणाऱ्या तरुणांच्या हातालाही काम मिळत आहे. फेसबुक, द्विटवरवर प्रभावी लिखाण करणाऱ्यांना काही मानधन देऊन उमेदवारांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकायला सांगितले जाते. प्रतिस्पर्धी उमेदवाराचे कच्चे दुवे शोधून त्यांना ट्रोल करण्याची जबाबदारीही फिक्स केली जाते.
 
 शिकाऊ  पत्रकारांना संधी
संवादकौशल्य असणाऱ्या किंवा इंटर्न पत्रकारांना स्थानिक यूट्युब चॅनेलचा बूम हाती देऊन मतदारसंघात फिरून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचे काम सोपवले गेले आहे. या तरुणांना २० ते २५ हजार रुपये मानधन दिले जाते. याखेरीज ते उमेदवारांच्या मुलाखती घेतात. त्यांना गुणवत्तेनुसार मानधन आम्ही देतो, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

निवडणूक आयोगाची करडी नजर
बदलणाऱ्या डिजिटल युगात निवडणूक प्रचाराच्या पारंपरिक पद्धती काही प्रमाणात कमी झाल्या असून, त्याची जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे. त्यामुळे  सोशल मीडियावरून केला जाणारा प्रचार व त्याचा खर्च यावर देखरेख करणे हे मोठे आव्हान  आहे. त्यामुळे डिजिटल प्रचारांवर निवडूक आयोगाची करडी नजर आहे.  

असे आहेत  निकष
- सोशल मीडियावर खाते असणे अनिवार्य, २५ हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स, खात्यावरून पोस्टची नियमितता, रील्स बनवण्यात पारंगत, राजकीय समज, चांगल्या पद्धतीचे लाइव्ह, चांगले स्टीकर.


 आम्हाला राजकीय प्रचारासाठी मागणी वाढली आहे. अनेक पक्षांतील उमेदवारांनी आमच्याकडे संपर्क साधला आहे.
- यूट्युबर्स

  यंदा उमेदवारांचा प्रचारासाठी रील्स तयार करण्यासाठी चांगले मानधन मिळत आहे. रील्स स्टारच्या  लोकप्रियतेनुसार पक्षाकडून डिमांड जास्त आहे. 
- रील्स स्टार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()