आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

Published on

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
पोलिसांचा बंदोबस्त ः निकालाची उत्सुकता शिगेला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी (ता. २३) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा आणि ओवळा-माजिवडा या चारही मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी आवश्यक टेबल्स, पोलिंग स्टाफ, बंदोबस्तासाठी आवश्यक पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे.
ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीनंतर आता मतपेट्या स्ट्राँगरूममध्ये जमा झाल्या आहेत. त्या ठिकाणी कडकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी एसआरपीएफची एक तुकडी कार्यरत असून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचतील. त्यानंतर साडेसहा वाजता सराव सुरू होऊन तो साडेसातपर्यंत सुरू राहील. आठ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होऊन ती १५ मिनिटांत पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्येक राऊंड हा १० ते १५ मिनिटांचा राहणार असून साधारणपणे ११ वाजता निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी २२ टेबल व्यवस्था व १०७ अधिकारी कर्मचारी असणार आहेत, तर ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २१ टेबल लावण्यात येणार असून सुमारे ३९ फेऱ्या होतील, असे अपेक्षित आहे, तसेच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात १४ टेबल असणार असून या ठिकाणी २६ फेऱ्यांमध्ये निकाल हाती येईल, असे अपेक्षित आहे.
..................................
कुठे मतमोजणी केंद्र
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ - न्यू होराइझन एज्युकेशन सोसायटी, सी इमारत, रोडास सोसायटी समोर हिरानंदानी इस्टेट ठाणे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ- न्यू होराइझन स्कूल पहिला मजला, आनंद नगर, कावेसर, घोडबंदर
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ- मोलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुल कौसा, मुंब्रा.
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ- वर्कशॉप क्रमांक १, आयटीआय, रोड नं. २८, वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी होणार आहे.
................................
स्ट्रॉंंगरूम सुरक्षा व्यवस्था
स्ट्राँगरूम भोवती त्रिस्तरीय सुरक्षा कड्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात केंद्रीय शसस्त्र पोलिस दलाचे जवान, दुसऱ्या टप्प्यात राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये स्थानिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्ट्राँगरूमच्या आवारात, तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने महावितरण कंपनीने विद्युत बिघाड होऊ नये याची खबरदारी घेतली आहे.
............................
आनंदाश्रमात होणार जल्लोष
कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवाडा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवारांच्या विजयी जल्लोषाची तयारी पूर्ण झाली आहे. फटाके, गुलाल, ढोल-ताशे, बॅण्ड पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. शिवसैनिकांचे शक्तिकेंद्र असलेल्या आनंदाश्रम येथे जल्लोष करण्यात येणार असून विजयाचा गुलाल उधळला जाईल, असे शिवसेना प्रवक्ते व खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
..................................
मिठाईसाठी वेट ॲण्ड वॉच
आपलाच विजय होणार आणि जल्लोष आपणच करणार, असा विश्वास सर्वच उमेदवार दाखवत असले तरी फाजील आत्मविश्वास त्यांनी तुर्तास बाजूला ठेवला असल्याचेही दिसते. मिठाईसाठी आगाऊ बुकिंग कोणत्याच उमेदवारांनी अद्याप केलेली नाही. पण असे असले तरी ठाण्यातील प्रमुख मिठाईवाल्यांनी आपली तयारी पूर्ण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.