मुंबई : जगभरातील गिर्यारोहक मार्च ते जून या कालावधीत नेपाळमध्ये एव्हरेस्ट व अन्य शिखरे पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर येतात. या वर्षी फेब्रुवारीपासूनच जगभरात 'कोव्हिड-१९' विषाणूचे थैमान सुरू झाल्यामुळे नेपाळ सरकारने सर्व शिखर मोहिमा रद्द केल्या. परिणामी उदरनिर्वाहासाठी शिखर मोहिमांवर अवलंबून असलेल्या शेर्पांचा सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिकचा रोजगार बुडाला आहे.
नेपाळच्या अर्थव्यवस्थेत गिर्यारोहण आणि पर्यटन या क्षेत्रांचा महत्त्वाचा वाटा आहे. या क्षेत्रांकडून 300 दशलक्ष रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. परंतु, या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गिर्यारोहण व पर्यटन व्यवसाय ठप्प झाले. शेर्पा समुदाय तर पूर्णतः या व्यवसायांवर अवलंबून असतो. नेपाळमध्ये येणारा एक पर्यटक तेथील 11 कुटुंबांना आधार देतो.
आता पर्यटकच नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेर्पांच्या एजन्सीमध्ये 30 ते 100 जण काम करतात. या वर्षी शिखर मोहिमा नसल्याने त्यांना पगार कसा द्यायचा, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. हातात उरलेल्या पैशातून पुढील हंगामापर्यंत गुजराण कशी करायची, अशी चिंता प्रत्येक शेर्पाला लागली आहे.
आठ हजार मीटरहून अधिक उंचीची शिखरे सर करणारे मिंग्पा शेर्पा यांची नेपाळमध्ये सर्वांत मोठी शेर्पा एजन्सी आहे. माझ्याकडे हजारपेक्षा जास्त लोक काम करतात. आमचे या वर्षी खूप नुकसान झाले. गावांत राहणाऱ्यांना थोडासा दिलासा आहे. शिखर मोहिमांतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून असणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, असे ते म्हणाले.
या चार महिन्यांच्या हंगामात 100 कोटींचा व्यवसाय होतो. या वर्षी तो शून्यावर आला आहे, असे त्यांनी सांगितले. हॉटेल, वाहतूक बंद आहे. उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद आहेत. 40 ते 50 शेर्पांना पगार द्यायचा आहे, भाडे भरायचे आहे, असे पिक प्रमोशन शेर्पा एजन्सीचे अध्यक्ष केशब पौडयाल म्हणाले.
एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम रद्द
सर्व शिखर मोहिमा रद्द झाल्यामुळे सर्व शेर्पा संस्थांनी एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेचा प्रस्ताव नेपाळ सरकारला दिला होता. लॉकडाऊनमुळे एव्हरेस्ट शिखरावर मानवी वावर नसल्याने साचलेला कचरा स्वच्छ करणे, अडकून पडलेले मृतदेह खाली आणणे अशी कामे करण्यात येणार होती. परंतु, नेपाळ सरकारने लॉकडाऊनमुळे ही मोहीम राबवू शकत नाही, असे सांगितले. एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम लॉकडाऊन संपल्यावर किंवा पुढील वर्षी राबवण्यात येईल, अशी माहिती शेर्पांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.