वसई : वसई-विरार महापालिकेला ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात अपयश येत आहे. वर्गीकरण न करताच ज्या ठिकाणी कचरा जमा होतो, तो तसाच गाठोड्यात एकत्रित केला जात आहे. त्यामुळे वसई-विरारमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याची गाठोडी दिसत असून कचरा वर्गीकरणाची कागदावरची घोषणा प्रत्यक्षात अंमलात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वसई-विरार महापालिका एकीकडे स्वच्छ शहर, सुंदर शहराच्या घोषणा देतानाच स्वच्छतेचा जागर करण्यासाठी नागरिकांच्या बैठका, चर्चा, माहिती पत्रके यांसह पथनाट्य घेण्याचे काम करत आहे. कचराकुंडीत कचरा टाकण्याचे आवाहन केले जात आहे, तर खतनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सूटही दिली जात आहे, तर दुसरीकडे वसई, विरार, नालासोपारा शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचराकुंड्यांची कमतरता, रस्त्यावर साचलेला कचरा, माशांचा, डासांचा वाढत असलेला प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने कृतिशील पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात रोज जमा होणारा कचरा हा वसई पूर्वेकडील कचराभूमीवर टाकला जातो.
कचराभूमीवरील कचऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवर गंभीर होत आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे नागरिकांना आणि औद्योगिक वसाहतीला फटका बसत आहे. त्यामुळे ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून तशा सूचनादेखील स्वच्छता विभागाला दिल्या आहेत; परंतु कचरा नागरिकांकडून वेगळा केला जात नसल्याने घंटागाड्यादेखील कचरा वर्गीकरण न करता एका गाठोड्यात तो भरून वाहनात टाकत आहेत.
अंमलबजावणीबाबत पालिका उदासीन
कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकेने जागेवरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला; परंतु कार्यवाही झाली नाही. शून्य कचरा मोहिमेची घोषणा केली गेली; मात्र अंमलबजावणीला सुरवात झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी प्रदर्शन घेण्यात आले; परंतु पालिकाच उदासीन भूमिका घेताना दिसत आहे.
ओला आणि सुका कचरा स्वतंत्र डब्यात ठेवावा. वर्गीकरण करावे, असे आवाहन नागरिकांना नेहमीच केले जाते. ज्या ठिकाणी वर्गीकरण केले जात नाही, तिथला कचरा वाहनांत टाकून कचराभूमीवर नेला जातो आणि तिथे वर्गीकरण केले जाते.
- वसंत मुकणे, स्वच्छता अधिकारी, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.