ठाणे : ईस्टर्न फ्री-वे (पूर्व मुक्तमार्ग) तयार होण्यापूर्वी ठाण्यातून रस्तामार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात जाण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. या प्रवासातील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण होत होते; परंतु ईस्टर्न फ्री-वे मानखुर्दपर्यंत आल्यानंतर वाहनचालकांच्या वेळेत मोठी बचत होत आहे. आता तर हा फ्री-वे थेट ठाण्याच्या वेशीपर्यंत करण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे वाहनप्रवास अधिक वेगवान होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विविध प्रकल्पांची आढावा बैठक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. 14) मंत्रालयात घेतली. या वेळी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील मेट्रो प्रकल्प, शिवडी-न्हावा-शेवा ट्रान्स हार्बर लिंक, ईस्टर्न फ्री-वेचा विस्तार, परवडणारी घरे आदी प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला. पूर्व मुक्तमार्ग सध्या मानखुर्द येथे संपतो; परंतु त्यापुढे मुलुंड आणि ठाण्याच्या दिशेने मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा मुक्तमार्ग मुलुंडपर्यंत आणि सीएसटीएम भागात जीपीओपर्यंत (मुख्य टपाल कार्यालय) वाढवण्याबाबत पावले उचलण्याचा आदेश शिंदे यांनी दिला.
ईस्टर्न फ्री-वेवरून ठाण्याकडे येणारे वाहनचालक मानखुर्दला 20 मिनिटांत पोहोचतात; मात्र त्यानंतरच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे अडथळे येतात. त्यामुळेच हा उड्डाणपूल थेट मुलुंडपर्यंत आणण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर ठाण्यातून जाणारा महामार्ग आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी साकेत-गायमुख किनारी रस्त्याचे (कोस्टल रोड) नियोजन एमएमआरडीएने करावे आणि विस्तारित मुक्तमार्ग या रस्त्याला जोडावा, अशी सूचना शिंदे यांनी केली.
ऐरोलीकडून ठाण्याकडे येताना वाहनचालकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. काही वर्षांनंतर या परिसरातील वाहनांची संख्या आणखी वाढणार असल्याने या वाहतूक कोंडीत अधिक भर पडेल. त्यामुळे ही वाहतूक कोंडी टाळणारा मार्ग तयार करण्यासाठी काही वर्षे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टीने कोपरी-पटणी खाडीपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा आदेशही शिंदे यांनी दिला.
"ग्रेड सेपरेटर'साठी एमएमआरडीएमार्फत निधी
ठाण्यातील तीनहात नाका येथे सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी केवळ शहरातील नव्हे; तर बाहेरील वाहनचालकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. वाहनचालकांना या सिग्नलवर किमान तीन मिनिटे थांबावे लागते. वाहतूक कोंडीत अडकल्यास दोन वेळा सिग्नल पडेपर्यंत वाहनचालकांना निघता येत नाही. त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे महापालिकेने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी "ग्रेड सेपरेटर' (उड्डाणपूल) प्रकल्प आखला आहे. परंतु हा प्रकल्प खर्चिक असल्याने त्याचे काम केवळ कागदावर राहिले होते. या बैठकीत "ग्रेड सेपरेटर' प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी देण्याची घोषणा शिंदे यांनी केली.
मेट्रो प्रकल्पांच्या जुळणीची चाचपणी
ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा या दोन मेट्रो प्रकल्पांच्या जुळणीसंदर्भात (अलाईनमेंट) अनेक तक्रारी आहेत. भिवंडी-कल्याण टप्प्यात ही जुळणी बदलण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रोचा मार्ग शिळ-कल्याणमार्गे न नेता विरळ लोकवस्ती असलेल्या गावांमधून नेल्याच्याही तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेऊन या दोन मार्गांची अलाईनमेंट बदलण्यासंदर्भात चाचपणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मल्टीमोडल कॉरिडॉरला अग्रक्रम
एमएमआर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरचे काम राज्य सरकार प्राधान्याने हाती घेणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच या संपूर्ण प्रदेशातील आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या प्रकल्पाला अग्रक्रम देण्याचा आदेशही त्यांनी एमएमआरडीएला दिला. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरसाठी 104 पैकी 55 गावांमध्ये संयुक्त मोजणी सर्वेक्षणाचे (जॉईंट मेजरमेंट सर्व्हे) पूर्ण झाले असून समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धर्तीवर बाधितांना मोबदला देण्यात येणार आहे. हा प्रकल्प एमएमआर प्रदेशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे "फास्ट ट्रॅक' तत्त्वावर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.