मोखाडा : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाच्या खाली वसलेल्या सावर्डे, दापूर आणि सावरखुट या गावांसह अन्य गावपाडे वसलेली आहेत. येथील नागरीकांना वैतरणा नदीपलीकडे जाण्या येण्यासाठी नदी पात्रावर पक्का पूल नाही. धरणातून पाण्याचा अचानक विसर्ग केल्याने, आतापर्यंत दहाहून अधिक नागरीकांचा बळी गेला आहे. त्यामुळे नदीपात्रावर पक्का पूल बांधण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी शेकडो आदिवासींनी मध्य वैतरणा धरणाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडत, धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई व उपनगरांची तहान भागवण्यासाठी मोखाड्यात मध्य वैतरणा धरण बांधण्यात आले आहे. वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणाच्या खाली, सावर्डे, दापूर आणि सावरखूट या गावांसह अन्य गावपाडे आहेत. येथील नागरीकांना मध्य रेल्वेच्या ऊंबरमाळी आणि कसारा रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी, वैतरणा नदीचे पात्र ओलांडून जावे लागते आहे. येथील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी, तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये नदी पात्रावर तात्पुरत्या स्वरूपात सन 2022 मध्ये लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. तसेच पक्का मोठा पूल बांधण्यासाठी प्रशासनाने सर्व्हेक्षण देखील केले आहे. मात्र, त्यानंतर पूल बांधण्यासाठी प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
नदीपात्रावर पक्का पूल बांधण्यासाठी येथील नागरीकांनी अनेकदा मागणी केली आहे. मध्य वैतरणातून पाण्याचा कधीही विसर्ग करण्यात येतो. त्यावेळी लोखंडी पूल पाण्याखाली जातो. हा पुलं व नदीपात्र पार करताना, दोन वर्षात तब्बल दहाहून अधिक नागरीकांचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. मागील महिन्यात भास्कर पादीर या आदिवासीचा असाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील आदिवासी संतप्त झाले आहेत. त्यामुळे नदीपात्रावर पक्का पूल बांधण्याच्या मागणीने उचल घेतली आहे. पक्का पूल बांधण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी शेकडो आदिवासींनी मध्य वैतरणा धरणाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडत, बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत येथून उठणार नसल्याचा निर्धार आंदोलनकऱ्यांनी केला आहे. तसेच बेमुदत उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने दुपारनंतर आंदोलन मागे....
मुंबई महानगरपालिका जल अभियंता विभागाचे उपजल अभियंता पराग शेठ व कार्यकारी अभियंता जयंत खराडे हे आंदोलकांना सामोरे गेले. त्यांनी आंदोलनकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी व शासन दरबारी निर्णय घेण्यासाठी 45 दिवसांचा कालावधीची मुदत दिली आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन त्यांनी आंदोलनकऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे दुपारी 4 वाजता आंदोलन स्थगित करून मागे घेण्यात आले आहे.
आंदोलनकऱ्यांच्या मागण्या...
वैतरणा नदीवर पक्का पूल बांधून, सावर्डे ते दापूर रस्ता तयार करणे.
नदीच्या प्रवाहात मृत पावलेल्या व्यक्ती च्या कुटुंबाला अर्थ सहाय्य मिळावे. त्याच्या वारसांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळावी.
धरणाच्या प्रवेशद्वारातून सावर्डे, दापूर आणि सावरखुट येथील ग्रामस्थांना रहदारीची परवानगी मिळावी.
धरण परिसरात कायमस्वरूपी जीव रक्षक दल तैनात ठेवणे.
धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याअगोदर, लगतच्या गावांमध्ये दवंडी देणे व सायरन वाजवणे.
दापुरे आणि सावर्डे गावांना नळपाणीपुरवठा योजना करून मिळावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.