रायगडमधील पर्यटन वीस टक्क्याने महागले; निवास व्यवस्थाही न परवडणारी

Raigad tourism
Raigad tourismsakal media
Updated on

अलिबाग : काही दिवसांतच शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षाचा हंगाम (Exam period) संपेल. यामुळे अनेक कुटुंबे पर्यटनासाठी बाहेर पडतील. मात्र, यंदा महागाईमुळे (inflation) त्यांना खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण होणार आहे. इंधन दरवाढीबरोबरच व्यावसायिक सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीसह (cylinder price increases) अन्य जिन्नसची झालेली भाववाढ त्याला कारण ठरणार आहे. रायगड जिल्ह्यात तर पर्यटन (Raigad tourism) २० टक्क्याने महाग झाले आहे. एक महिन्यापूर्वी सात रुपयाला मिळणारा चहाचा कप सध्या दहा रुपये, वडापाव १० ते १२ रुपयांवरून १५ ते २० रुपयांत विकण्यात येत आहे. जेवणाचे ताट, मुक्कामाची सोयही महाग झाली आहे.

Raigad tourism
मोखाड्यात टंचाईग्रस्त 39 गाव पाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा

मुंबई-पुणे अशा मोठ्या शहरांच्या शेजारामुळे रायगडमधील पर्यटनस्थळांवर नेहमीच गर्दी असते. सुटीचे दिवस अशा ठिकाणी विक्रमी गर्दी होते. कमी खर्चात मनसोक्त पर्यटन हे रायगडच्या पर्यटनाचे प्रमुख वैशिष्ट्य असले तरी जीवनाश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा परिणाम झाला आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवण आणखी महागणार होणार आहे. शाकाहारी खाद्यपदार्थ २० टक्के, तर मांसाहारी पदार्थांच्या किमती ३० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय येथील रेस्टॉरंट मालकांनी घेतला आहे.

वाढती इंधन दरवाढ आणि महागाईमुळे दैनंदिन खर्च भरून काढण्यासाठी हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे येथील पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कोरोना काळ, दोन चक्रीवादळे यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला. व्यवसाय बंद असल्याने खर्चात वाढ झाली, तर उत्पन्नात घट झाल्याची ओरड येथील पर्यटन व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे आता नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी आणि हॉटेल व्यवसायात तग धरून ठेवण्यासाठी आम्हाला खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्यापलिकडे पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Raigad tourism
मुंबई : विमानतळ जागेवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन

एका लहान हॉटेलमध्ये दिवसाला दोन सिलिंडर वापरले जातात; तर मोठ्या हॉटेल्समध्ये एका दिवसाला व्यावसायिक वापरातील पाच सिलिंडर वापरले जातात. सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडर दोन हजार ३६० रुपयांना मिळतो. व्यावसायिक सिलिंडर तब्बल ६०० रुपयांनी महाग झाल्याची माहिती इंडेन गॅसचे नितीन शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील पर्यटनस्थळावरील लहान टपरीधारकांच्याही खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी सात रुपयाला मिळणारा चहाचा एक कप दहा रुपये, वडापाव १५ रुपये, आमलेट पाव ४० रुपये असे भाव झाले आहेत; तर वाहतुकीचे दर २० ते २५ टक्के रुपयांनी वाढले आहेत. निवास व्यवस्था १० टक्क्यांनी वाढली आहे.

निवास व्यवस्था न परवडणारी

एक रात्र मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवावी म्हणून अनेक जण येथील पर्यटनस्थळांना भेट देतात. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळाने येथील कॉटेज, लहान हॉटेलांचे नुकसान झाले आहे. यात लाखो रुपये तोटा सहन करावा लागल्याने तो भरून काढण्यासाठी येथील व्यावसायिकांनी निवास व्यवस्थेचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढविले आहेत.

पर्यटनावरील दृष्टिक्षेप

वर्षाला येणारे पर्यटक - १० लाख
वार्षिक उलाढाल - ५०० कोटी

मुंबई-पुण्यातील पर्यटक हे रायगड जिल्ह्यात ताज्या माशांची चव चाखण्यासाठी येतात; परंतु पापलेट, सुरमई यांसारख्या चांगल्या मासळीच्या किमती साधारण ५० टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे मासळी थाळीचे दर वाढवले आहेत. चिकन थाळीच्या किमतीतही ३० टक्क्यांनी वाढ करावी लागली. या वाढीमुळे हॉटेलमध्ये येणारे ग्राहक कमी झालेत.
- सिद्धार्थ ठमके, हॉटेल व्यावसायिक, मुरूड.

दरवाढीवर दृष्टिक्षेप

प्रकार / दोन महिन्यापूर्वी / आताच्या किमती (रुपयांत)
चहा / ७ / १०
वडापाव / १० / १५-२०
पापलेट थाळी / ३५० / ४००
निवास व्यवस्था / १५००/ २०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.