एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही! 

mill worker
mill worker
Updated on

मुंबई, ता. 1 : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे अतुलनीय योगदान आहे. आपले सरकार आल्यानंतरही गिरणी कामगारांना घरांसाठी मोर्चा काढावा लागत असेल, तर पूर्वीच्या आणि आताच्या सरकारमध्ये फरक काय, असे स्पष्ट करत मुंबईतील एकाही गिरणी कामगाराला बेघर राहू दिले जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज (ता.1) म्हाडाच्यावतीने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसासाठी 3,894 घरांची सोडत वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी बॉम्बे डाईग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत रविवारी काढण्यात आली. सोडतीचा शुभारंभ करण्याचा मान मुख्यमंत्र्यांनी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांना दिला. यावेळी ठाकरे म्हणाले की, आपण सगळे एका परिवारातील आहोत.या वाक्‍यावर कोणाचा विश्‍वास बसो अथवा ना बसो. गिरणी कामगार आणि मराठी माणूस हा नेहमीच शिवसेना आणि ठाकरे कुटुंबातील विषय आहे. मला अभिमान आहे की, आजपर्यंत शिवसेनेप्रमुखांनी अनेकांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री केले; मात्र 90 टक्के शिवसेना ही गिरणी कामगारांच्या पाठिंब्यावर उभी राहिली आहे. 

मुंबई आपण रक्त सांडून मिळवली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षाच्या काळात गिरणी कामगार उतरला नसता, तर मुंबई महाराष्ट्राला मिळालीच नसती. माझी नतदृष्ट म्हणून इतिहासात नोंद होऊ देणार नाही, म्हणून मी घराचे वचन घेऊन तुमच्यासमोर आलोय, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाचे सभापती विजय नाहटा, सचिन अहिर आदी उपस्थित होते. 

घरे विकून मुंबई गमावू नका! 
तुम्ही मला एक वचन देणार का?, ही घरे आम्ही तुमच्यासाठी देतो आहे, ती विकायची नाहीत. गिरणी कामगारांनी रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईत तुम्ही घरे विकून गमावू नका. मी तुम्हाला मुंबईत घरे मिळावीत, यासाठी प्रयत्न करत आहे, अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली. 
............ 
साडेनऊ लाखातच घर मिळणार!
गिरणी कामगारांच्या घराची किंमत बांधकाम खर्चामुळे वाढली आहे. परंतु घरांच्या किंमती कमी करण्याबाबत गिरणी कामगार संघटनांचा आग्रह आहे. त्यांच्याशी असलेले नाते जपत आज काढण्यात आलेल्या सोडतीमधील घराची किंमत साडे नऊ लाख रूपयेच असेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.