‘षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो अन् शिवसेनेचे चिन्ह न लावता माझ्याविरोधात निवडणूक लढून दाखवा! अन्यथा.. षंढ म्हणून फिरा. विजेते म्हणून फिरू नका. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला, दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही,’ अशा शब्दांत ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (शिंदे गट) अन् भाजपवर जोरदार टीका केली. ‘मोदींनी आतापासूनच विधानसभेचा प्रचार सुरू करावा, मी आहे अन् ते आहेत’ अशा शब्दांत त्यांनी भाजपलाही सुनावले.
पक्षाच्या ५८ व्या स्थापना दिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील काही ठिकाणचा पराभव माझ्या जिव्हारी लागला असून त्याचा वचपा काढू असेही त्यांनी ठणकावले. यावेळी विजयी आणि लढवय्या (निवडणूक लढलेल्या पण पराभूत झालेल्या) नेत्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार तडाखा बसल्याचे सांगत ठाकरे यांनी उपस्थितांनाच पुन्हा ‘एनडीए’ बरोबर जायचे का असा सवाल केला? त्यावर कार्यकर्त्यांनी ‘नको’ असे उत्तर दिले. निवडणुकीतील अपयश झाकण्यासाठी भाजप अन्य विषय पुढे आणत आहे असे सांगताना ठाकरे यांनी पुन्हा देशात निवडणूक झाली पाहिजे कारण आज ज्यांचा सत्कार केला ते उद्या पुन्हा खासदार होतील असे सांगितले.
‘आपल्यावर आरोप केला जातो की, शिवसेनेला हिंदू मते मिळाली नाहीत. मुस्लिम मते पडली आहेत. हो.. पडली आहेत, शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणत आहेत. मी हिंदुत्व वगैरे सोडलेले नाही. आज केंद्रामध्ये भाजपबरोबर कोण बसले आहे? चंद्राबाबू आणि नितीशकुमार ते काय हिंदुत्ववादी आहेत का?
आंध्रात चंद्राबाबूंनी मुस्लिम समाजाला वचने दिलेली नाहीत का? नितीशकुमारांनी मुस्लिम समाजाला वचने दिलेली नाहीत का? मुस्लिम समाज आमच्याबरोबर आहेच कारण आम्ही वार करू तर समोरून करू यांच्यासारखा पाठीत वार करणार नाहीत हे त्यांना ठावूक आहे,’’ असे ठाकरे यांनी सांगितले.
... तर मी नक्षलवादी
मिंधे यांनी शहरी नक्षलवादाचा मुद्दा काढला. ‘हुकूमशाही मोडा’ हा तुम्हाला दहशतवाद वाटतो का? देशाचे संविधान वाचविणे हा दहशतवाद वाटत असेल तर मी दहशतवादी आहे, असेही ठाकरे म्हणाले. ‘‘ तुमचे जे बापजादे दिल्लीत बसलेत ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत. रवींद्र वायकरांनी सांगितले की माझ्यापुढे मार्गच नव्हता.. तुरुंगात जा किंवा आमच्याकडे या असा पर्याय देण्यात आला होता. तो भ्रष्ट माणूस हे सांगतो हा तुमचा शासकीय नक्षलवाद नाही का?’’ असा सवाल ठाकरेंनी केला.
मोदींनी विधानसभेचा प्रचार करावा
‘मोदींना मी आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरू करा. मी आहे आणि तुम्ही आहात. नाव चोरायचे नाही, वडील चोरायचे नाहीत, पक्ष चोरायचा नाही, धनुष्यबाण बाजूला ठेवा आणि नवी निशाणी घ्या. मिंध्यांच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर! माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता? षंढ कुठले! एक गोष्ट चांगली झाली. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे समजले. काहींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला, म्हणजे उघड पाठिंबा दिला,’ असा टोलाही उद्धव यांनी राज ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरेंनी ४८ मतदारसंघांत प्रचार केला. आम्ही पाचचे नऊ खासदार केले. तुम्ही आकडे लावत बसा आम्ही सत्ता काबीज करू. आमचा दोनशेचा स्ट्राईक रेट असल्याने आमच्या नादाला लागू नका.
- भास्कर जाधव, ठाकरे गटाचे नेते
ऐतिहासिक विजय प्राप्त करून उद्धव ठाकरे यांनी भरारी घेतली असून ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला आहे. पंतप्रधान मोदींचे हिंदुत्व नकली असल्याने त्यांचा पराभव झाला आहे. जिथे राम तिथे मोदींचा पराभव झाला. सत्तेची मस्ती चालत नाही हे या निवडणुकीने दाखवून दिले.
- खा. संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते
ठाकरे म्हणाले ...
‘मविआ’ला मतदान केल्याबद्दल जनतेचे आभार
पंतप्रधान मोदींमध्ये अहंकार; माझ्यात आत्मविश्वास
लोकसभेत भाजपला जबरदस्त तडाखा बसला
शिवसेना संपविणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही
सरकार पडावे; मध्यावधीसाठी तयार राहावे
चंद्राबाबू, नितीशकुमार हे हिंदुत्ववादी आहेत का?
नखे काढलेले मुनगंटीवार वाघनखे आणत आहेत
पुन्हा येणारे म्हणतात आता जाऊ द्या ना घरी
अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना विधानपरिषद निवडणूक कशी होते?
शेंडी, जानव्याचे आणि गोमुत्रधारी हिंदुत्व आम्हाला नको
मिंध्यांच्या डोक्यावरील गद्दारीचा शिक्का पुसलेला नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.