Budget 2021: सेन्सेक्सची 2314 अंशांची हनुमानउडी

Budget 2021: सेन्सेक्सची 2314 अंशांची हनुमानउडी
Updated on

मुंबई:  केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतूदींमुळे आनंदी झालेल्या गुंतवणुकदारांनी आज बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांची तुफान खरेदी केली. त्यामुळे आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 2,314 अंशांनी वाढून 48,600 अंशांवर बंद झाला. निफ्टीदेखील 646 अंशांनी वाढून 14,281 अंशांवर स्थिरावला. 

कोरोनाशी झुंजणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करवाढ केली जाईल आणि त्यामुळे कंपन्यांचा नफा कमी होईल, अशी अपेक्षा आधी बाजारात वर्तविली जात होती. त्यामुळे गेले सहा दिवस निर्देशांकांची घसरगुंडी झाली होती. सेन्सेक्स तर 50 हजारांवरून 46 हजारांपर्यंत खाली आला होता. मात्र आज निर्देशांकांनी त्यातील निम्मे नुकसान भरून काढले. मुख्यतः संपत्ती कर तसेच शेअर गुंतवणुकीवरील दीर्घकालीन भांडवली नफाकर यात वाढ न झाल्याने गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला. 

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्पाचे भाषण वाचायला सुरुवात केल्यावर सेन्सेक्स वरखाली होत होता. मात्र त्यांचे भाषण संपत आल्यावर बहुसंख्य  तरतुदी उघड झाल्याने दुपारी एक वाजण्यापूर्वी सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली. त्याने 47 हजारांवरून थेट 48 हजारांवर झेप घेतली. 

आज मुख्यतः बँका तसेच वित्तसंस्था यांच्या समभागांमध्ये मोठी तेजी आल्याने निर्देशांकांमध्ये चांगलीच वाढ झाली. त्यामानाने आयटी क्षेत्र तसेच वाहन उद्योग यांचे समभाग कमी प्रमाणात वाढले. आज सेन्सेक्सच्या प्रमुख 30 समभागांपैकी फक्त डॉ. रेड्डीज लॅब पावणेचार टक्के कोसळला, तर टेक महिंद्र आणि हिंदुस्थान युनिलीव्हर हे समभाग अनुक्रमे दीड आणि पाव टक्का घसरले. त्याखेरीज अन्य सर्व 27 समभागांचे दर वाढले. 

सरकारी बँकांच्या भांडवलासाठी 20 हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद, विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुक मर्यादेत वाढ या आर्थिक क्षेत्रासाठीच्या तरतूदींमुळे या क्षेत्रातील समभाग आज सर्वात जास्त वाढले. इंडसइंड बँक 14 टक्के (बंद भाव 971 रु.), आयसीआयसीआय 12 टक्के (603 रु) यांनी अशी घसघशीत वाढ दाखवली. एचडीएफसी चा समभाग आज सुमारे 204 रुपयांनी वाढून (सुमारे पावणेनऊ टक्के वाढ) 2,582 रुपयांवर बंद झाला. बजाज फिनसर्व्ह देखील 979 रुपयांनी वाढून 9,699 रुपयांवर बंद झाला. 114 रुपयांनी वाढलेला लार्सन टुब्रो देखील 1,449 रुपयांवर स्थिरावला. त्याखेरीज अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक (710 रु.), बजाज फायनान्स (5,059 रु.), आयटीसी (215), एचडीएफसी बँक, महिंद्र आणि महिंद्र हे समभागही सहा ते पावणेआठ टक्के एवढे वधारले. 

52 रुपयांनी वाढलेला रिलायन्स आजही 1,900 रुपयांची पातळी वरच्या दिशेने ओलांडू शकला नाही, तो 1 हजार 895 रुपयांवर बंद झाला. सनफार्मा, नेस्ले, टीसीएस, इन्फोसीस, एचसीएल टेक हे समभाग देखील कमीअधिक प्रमाणात वाढले. जुनी वाहने मोडीत काढण्याच्या तरतूदींमुळे वाहन उद्योगांचे समभागही आज तेजीत होते. मात्र ते समभाग यापूर्वीच भरपूर वाढले होते, असेही जाणकारांनी दाखवून दिले.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

union budget 2021 sensex surges 2315 closing bell

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.