उरण : यशश्री शिंदे हीची निघृण हत्या झाल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. उरण तालुक्यात आजपर्यंत एवढा भीषण, अमानवी आणि मानवजातीला काळिमा फासणारा प्रकार घडलेला नव्हता त्यामुळे या युवतीचा खून करणाऱ्याचा तातडीने शोध घेऊन त्यास फाशी होईल असे पुरावे जमा करून आणि त्या दृष्टीने भारतीय न्याय संहितेची कलमे लावण्यात यावी अशी मागणी उरण सामाजिक संघटनेने पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी याच पार्श्वभूमीवर विविध मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
1) दुर्दैवी यशश्री शिंदे हीची हत्या करणाऱ्या इसमावर सन 2019 साली पोक्सो अंतर्गत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार या नराधमास अटक झाली होती. यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या वडिलांनी गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी रात्री आठच्या सुमारास उरण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील अधिकाऱ्याने ही तक्रार गांभीयनि घेतली नाही. त्याचवेळी दुदैवी यशश्रीचा मोबाइल सीडीआर तपासला असता, तर कदाचित तिचा ठिकाणा लागून तिचा जीव वाचला असता. म्हणून हलगर्जी करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यावर सक्त कारवाई करण्यात यावी.
2) उरण तालुक्यात रस्त्यांच्या बाजूला आणि इतर ठिकाणी अनेक भंगारवाल्यांनी दुकाने थाटलेली आहेत. हे भंगारवाले बहुतांशी परप्रांतीय आहेत. ही दुकाने नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणारी ठरू शकतात. तरी उरण तालुक्यातील सर्व भंगारवाल्यांची तपासणी करून, त्यांचे नाव, पत्ते घेऊन अनधिकृत भंगारवाल्या दुकानदारांवर सक्त कारवाई करावी.
3) उरण तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजार भरत आहेत. यासाठी कोणाची परवानगी घेतली जाते, बाजारातील दुकानदार कुठून येतात ? त्यांची नावे, पत्ते, मोबाईल क्रमांक याची माहिती पोलीस यंत्रणेकडे असणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तर महत्वाचे आहे. उरण तालुक्यातील शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे परप्रांतीयांचे लोंढे उरण येत आहेत. तरी याबाबत सुद्धा सक्त कारवाई होणे गरजेचे आहे.
4) उरण शहराच्या आसपास झोपडपट्टी वसाहती वाढत आहेत. या झोपडपट्ट्यांत परप्रांतीय आश्रयाला असतात तरी याबाबतही उचित कारवाई होणे अपेक्षित आहे.
5) शुक्रवार दि. 19 जुलै 2024 च्या रात्री केळवणे पनवेल येथील राजेश ठाकूर या तरुणाचा सारडे-पिरकोन रस्त्यावर अत्यंत गुढरित्या मृत्यू झालेला आहे. मृत्युच्या एक-दोन तास आधी सदरहू तरुण त्यांच्या घरच्या लोकांच्या संपर्कात होता. त्याच्या मोबाईल सीडीआर माहितीवरून त्याच आलेल्या मोबाईल क्रमाकांची चौकशी करून तपास होणे अपेक्षित आहे.
या सर्व मागण्या उरण तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित आहेत. उरण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून यापूर्वी काही प्रकरणांत अक्षम्य निष्क्रीयता दाखवली गेली आहे.त्यामुळे या प्रकरणांबाबत पोलीस यंत्रणेचे दायित्व दाखवून आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन उरण सामाजिक संघटनेच्या वतीने पोलिसांना देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.