'किक' बसण्यासाठी कफ सिरपचा वापर वाढतोय 

'किक' बसण्यासाठी कफ सिरपचा वापर वाढतोय 
Updated on

ठाणे : ठाणे पोलिसांकडून नशेबाजांवर आणि अमली पदार्थांच्या साठ्यावर सातत्याने कारवाई केली जात असल्याने आता सहज उपलब्ध होणारा कफ सिरपचा पर्याय गर्दुल्ल्यांसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे औषध दुकानांसह इतरत्रही कफ सिरपच्या बाटल्या मिळू लागल्या असून या बाटल्यांची तस्करी वाढल्याचे मुंब्रयातील घटनेवरून समोर आले आहे.

मुंब्रयात मित्तल मैदानातील सार्वजनिक शौचालयाजवळ सुमारे 10 हजार रुपये किमतीच्या तब्बल 115 कफ सिरपच्या बाटल्या मुंब्रा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी सौद सय्यद (रा. अमृतनगर) आणि शबनम ऊर्फ हनी सय्यद (26, रा. शिळफाटा) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. 

औट घटकेच्या नशेसाठी नशाबाज काय-काय करतील याचा नेम नाही. चरस, गांजा आदींसह एमडीसारख्या विविध ड्रग्सची तस्करी वाढत आहे. त्यामुळे तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्याने पोलिस प्रशासनाने कंबर कसली. तेव्हा, अमली पदार्थांच्या सेवनावर आणि विक्रीवर आळा बसावा म्हणून ठाणे पोलिसांसह अमली पदार्थविरोधी पथकाकडून नेहमीच कारवाया केल्या जातात.

तर, दुसरीकडे व्यसनापासून तरुणांना मुक्ती मिळावी यासाठी अमली पदार्थविरोधी मोहिमा राबवण्यात येतात. त्याचबरोबर ड्रग्ज फ्री कॅम्पसदेखील ठिकठिकाणी राबविले जातात. त्यामुळे, शहरांमध्ये अमली पदार्थांची आवक कमी होऊ लागल्याने नशा करण्यासाठी तरुण कफ सिरपचा सर्रास वापर करत आहेत. 

औषध दुकानात कफ सिरप हे डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) सहजपणे मिळणारे औषध आहे. या कफ सिरपचा जादा डोस घेतल्यास चांगलीच "किक' बसत असल्याने नशेबाजांकडून कफ सिरपला वाढती मागणी आहे. त्यामुळे बडे विक्रेतेही वाढीव दराने नशा करणाऱ्यांना कफ सिरपची विक्री करताना आढळतात. मुंब्रयात गुरुवारी (ता. 2) पकडण्यात आलेल्या महिला व पुरुष तस्करांकडून पोलिसांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीच्या कफ सिरपच्या 115 बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

या औषधांच्या सेवनाने झोप, गुंगी येते किंवा नशेकरिता कफ सिरप वापरण्यात येत असल्याने विनापरवाना औषधसाठा बाळगल्याप्रकरणी आरोपींना कलम 18 (अ), कलम 27 (बी) व 28 (ए) तरतुदीचे उल्लंघन केले आहे. तसेच हा साठा जाणीवपूर्वक विकण्याच्या दृष्टीने जवळ ठेवण्यात आल्याने त्यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. 

कफ सिरप औषध नव्हे; ड्रग्स... 

  • 20 मार्च 2017 - विवियाना मॉलसमोर गोरेगाव व जोगेश्वरी येथील तस्करांकडून विविध ब्रॅण्डच्या बाटल्या हस्तगत. 
  • 10 जानेवारी 2018 - अमली पदार्थविरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाकडून भिवंडीतील जुना गौरीपाडा येथून 1722 कफ सिरपच्या बाटल्या जप्त. 
  • 04 एप्रिल 2019 - खारेगाव टोलनाका येथे भिवंडी येथून रिक्षातून आणण्यात येत असलेल्या कफ सिरपच्या 1 हजार 734 बाटल्यांचा साठा त्रिकूटाकडून हस्तगत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.