ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक शाळांचे डिजिटलायझेशन देखील होत आहे. असे असताना दुसरीकडे शिक्षण विभागात उप शिक्षण अधिकारी यांच्यासह गट शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणत पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांना गट शिक्षणाधिकारी नसल्याने विस्तार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर गट शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या विस्तार अधिकाऱ्यांची दोन्ही पदांचा गाडा हाकताना पुरती दमछाक होत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उप शिक्षणाधिकारी पदासह गट शिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे. प्राथमिक शिक्षण विभागात दोन उपशिक्षणाधिकारी पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पद रिक्त आहे. तसेच तालुका स्तरावर शिक्षण विभागातील प्रशासकीय कामासोबतच तेथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपाययोजना व विविध योजना राबविण्याची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांवर असते. असे असताना पाचही तालुक्यापैकी एकही तालुक्यात गट शिक्षणाधिकारी नसल्याचे उघड झाले आहे.
शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी या पाच तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळणे, विद्यार्थी पटसंख्येत होणारी घट आदी बाबींवर उपाययोजना करण्याबरोबरच जिल्ह्यातील खासगी शाळांवरही देखरेख ठेवणे आदी कामे शिक्षण विभागामार्फत करण्यात येतात. त्यात शाळांना मान्यता देणे, कर्मचाऱ्यांची संख्या ठरविणे, अनुदानाचे वाटप करणे, शाळांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे आदी महत्त्वपूर्ण कामे या विभागामार्फत केली जातात. मात्र, रिक्त पदांमुळे शिक्षण विभागाचा कारभार हाकणे कठिण झाले आहे.
दरम्यान, ज्या विस्तार अधिकाऱ्यांवर उप शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी पदांचा कार्यभार सोपविण्यात येतो, त्यांची पदे देखील मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यात मुरबाड तालुक्यात 11 विस्तार अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून केवळ दोनच विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. तर, कल्याणमध्ये 6 पैकी केवळ एक विस्तार अधिकारी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील शिक्षण विभागाचा गाडा हाकताना विस्तार अधिकाऱ्यांची पुरती दमछाक होत आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची कार्यवाही सरकारस्तरावर होत असते. ही पदे भरण्यासंदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार करणार आहे.
- शेषराव बढे, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद ठाणे.ठाणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यात गट शिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. ही पदे सरकारकडून लवकरात लवकर भरण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. त्याबाबत पाठपुरवा सुरू आहे.
- सुभाष पवार, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण विभाग,
जिल्हा परिषद ठाणे.
-------------------
(संपादन : प्रणीत पवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.