मुंबई : कोव्हिड लसीकरणासाठी कोव्हिड केंद्रांचा वापर करण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. लसीकरणासाठी मुख्य रुग्णालयांवर अवलंबून राहिल्यास तेथील यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे लसीकरण कोव्हिड केंद्रांत केले जाऊ शकते.
राज्य टास्क फोर्सने सर्व लोकांना लस बंधनकारक करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्यासाठी रोज 50 हजार जणांना लस देता येईल, असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 लसीकरण केंद्र तयार करण्याचा विचार महानगरपालिका करत आहे.
लसीकरणासाठी परळ येथील केईएम रुग्णालय, शीव येथील सायन रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही आठ लसीकरण केंद्र नियोजित केली आहेत; मात्र या ठिकाणी इतरही रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा इतर रुग्णांना त्रासही होऊ शकतो. शिवाय रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
पहिल्या दोन टप्प्यांत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण रुग्णालयांतील केंद्रात केले जाईल; मात्र तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर सामान्य नागरिकांचे लसीकरण करायचे झाल्यास इतरांची व्यवस्था जम्बो कोव्हिड केंद्रात करावी, अशी शिफारस काही अधिकाऱ्यांनी केली आहे.
कोव्हिड केंद्रात रुग्ण नसल्याने ती रिकामे आहेत. तेथे लसीकरण करण्याचे विचाराधीन आहे. असे केल्यास मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. मोहन जोशी,
अधिष्ठाता, शीव रुग्णालय
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.