वडाळा : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना अनेकदा कामकाजामुळे पंढरपूर येथील पांडुरंगाच्या वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुंबईत पांडुरंगाच्या वारीचे दर्शन व्हावे यासाठी वारकरी प्रबोधन महासमितीतर्फे दरवर्षी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा वडळ्यातील फाईव्ह गार्डन येथे रविवारी (ता. ५) हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकर आणि पर्यटकांना घडले. सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते माऊलीच्या घोड्याचे गोल रिंगण.
२००१ पासून श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने मुंबईत या सोहळ्याचे आयोजन केले जाते. रविवारी टाळमृदंगाचा गजर, अभंग आणि त्यावर तल्लीन होऊन नाचणारे वारकरी असा सोहळा मध्य गिरणगावात रंगला. विठुनामाच्या गजराने अवघे गिरणगाव दुमदुमून गेले. सकाळी ९ वाजता कॉटनग्रीन येथील श्रीराम मंदिर येथून पालख्यांचे प्रस्थान काळाचौकी, लालबाग, परळ, भोईवाडा मार्गे प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळा विठ्ठल मंदिराकडे झाले. पांढरा सदरा आणि टोपी घातलेले वारकरी, नऊवारी साड्यांतील महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या दिंडीत सहभागी झाल्या. दुपारी पालख्या फाइव्ह गार्डन येथे पोहोचल्या आणि त्या ठिकाणी डोळ्यांचे पारणे फेडणारा माऊलीच्या घोड्यांच्या रिंगणाचा आकर्षक सोहळा रंगला.
दरम्यान, वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘वारकरी रत्न पुरस्कार’ आळंदीतील मारोती थोरात यांना; तर ‘संत हैबतबाबा वारकरी सेवा भूषण पुरस्कार’ नाशिक येथील शिवराम म्हसकर यांना देण्यात आला. प्रमुख पाहुणे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालखी सोहळ्यात खासदार अरविंद सावंत, माजी आमदार बाळा नांदगावकर आदी लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.