Encroachment Crime : वसई-चिंचोटी येथील 85 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; महापालिका विभागाची धडक कारवाई
विरार - पालिका अधिकाऱयांवर काल झालेल्या हल्ल्यानंतरही पालिकेची अनधिकृत बांधकामाचे विरोधातील कारवाई थांबली नसून आज वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘जी`अंतर्गत येणाऱ्या वसई-चिंचोटी परिसरात महापालिका विशेष नियोजन विभागाच्या माध्यमातून दिवसभर (1 ऑगस्ट) अतिक्रमणविरोधी धडक कारवाई सुरु होती. अतिरिक्त आयुक्त (उत्तर) रमेश मनाळे, उपायुक्त अजीत मुठे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 85 हजार चौरस फूट अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
वसई-विरार महापालिकेच्या नऊही प्रभाग समितींत होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्ष`ची स्थापना करण्यात आलेली आहे. पालिकेच्या निदर्शनास येणाऱ्या व जनतेच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींवर या विभागाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई करण्यात येते.
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीव्यतिरिक्त महापालिकेतून वगळलेल्या 21 गावांच्या नियोजनाचे अधिकार राज्य सरकारने महापालिकेला सोपवले आहेत. त्यामुळे संपूर्ण वसई-विरार उपप्रदेशाच्या विकासाचे नियोजन व शासनाने मंजूर केलेल्या उपप्रदेशाच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे काम पालिका करत आहे.
या गावांचा विकास व्हावा, या भागात अनधिकृत बांधकामे होणार नाहीत व झालीच तर त्यावर तोडक कारवाई व्हावी, यासाठी महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार विशेष नियोजन प्राधिकरण विभागाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे या गावांच्या हद्दीत होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर या विशेष नियोजन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे.
याच कारवाईचा भाग म्हणून आज (1 ऑगस्ट) दिवसभर वसई चिंचोटी आणि परिसरात अतिक्रमणविरोधी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पालिका अधिकाऱ्यांसह अभियंता, एमएसएफ व अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी व इतर प्रभाग अधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला होता.
विशेष म्हणजे; महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार व अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अजीत मुठे यांनी काल (31 जुलै) प्रभाग समिती ‘जी`वालीवअंतर्गत कोल्ही, चिंचोटी व शिल्लोत्तर येथील अंदाजित 11 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यानच उपायुक्त अजीत मुठे यांना भूमाफियांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.