Pana Murder: वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास संशयातून एका तरुणाने तरुणीची भररस्त्यात लोखंडी पान्हयाने डोक्यात तब्बल १६ घाव करून हत्या केली.
ती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत असताना, आजूबाजूला प्रचंड गर्दी असतानाही त्याने पुन्हा तिच्या डोक्यात लोखंडी पान्हयाने घाव केले. चारित्र्यावर संशय असल्यानेच तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली आहे. ८ जूनलाही आरतीला रोहितने मारहाण केली होती.मात्र पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.
आरती यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव (२८) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. हेदोघेही नालासोपारा शहरात राहणारे आहेत. दोघांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरती वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथील एका खाजगी कंपनीत कामाला होती. तर रोहितही एका कंपनीत कामाला आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास चिंचपाडा परिसरात कामावर जात असलेल्या आरतीच्या डोक्यावर रोहितने पाठीमागून लोखंडी पान्हयाने एकापाठोपाठ तब्बल १६ घाव घातले.
रक्तबंबाळ होऊन रस्त्यावरच कोसळलेली आरती जिवंत आहे का हे पडताळून पाहून रोहितने पुन्हा तिच्या डोक्यावर लोखंडी पान्हयाने घाव घातले. यावेळी काही जणांनी रोहितला रोखण्याचाही प्रयत्न केला. पण, संतापलेला रोहित त्यांनाच मारण्याची धमकी देत आरतीवर घाव घालत होता. आरतीची हत्या केल्यानंतर रोहित शेजारीच असलेल्या एका दुकानाच्या पायरीवर बसून राहिला होता.
याघटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रोहितला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रोहित यादवला अटक केली आहे. आरतीच्या चारित्र्यावर संशय असल्यानेच रोहितने तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
८ जूनलाही आरतीला केली होती मारहाण
रोहितने ८ जूनच्या रात्री आरतीला लाथ्याबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच तिचा नवा मोबाईलही फोडला होता. याप्रकरणी आरतीच्या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी रोहितविरोधात गुन्हाही दाखल केला होता. मात्र, त्याला अटक करण्यात न आल्याने तो मोकाट सुटला होता. त्यानंतर १८ जूनच्या सकाळीच रोहितने आरतीची हत्या केली. आचोळे पोलिसांनी ८ जूनला रोहितवर कारवाई केली असती तर आरतीची हत्या झाली नसती. पोलिसांनी त्याला दांडक्याने दोन-तीन फटके मारून सोडून दिले होते, असा आरोप आरतीच्या बहिणीने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.