विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर कोणाला कोणत्या जागेवर उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी दोन गट निर्माण झाल्याने त्यांनी वेगवेगळी चूल मांडल्याने या पक्षांतील कार्यकर्ते विखुरले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीत गटबाजीचे वारे कोणत्या दिशेने वाहतील, हे निकालावेळी स्पष्ट होणार आहे.
वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या निवडणुकीत आमदारकीची विजयश्री खेचून आणली होती. प्रतिस्पर्धी शिवसेनेत, सध्या काँग्रेसमध्ये असणारे विजय पाटील यांचा पराभव झाला होता, मात्र या वेळी चित्र बदलले आहे. ठाकरे गटामध्ये फूट पडल्यावर अनेक कार्यकर्ते हे शिंदे गटात सहभागी झाले, तर या गटानेदेखील संघटना बांधणीसाठी अनेक निर्णय घेतले, परंतु कार्यकर्ते दोन दिशेला असताना ठाकरे आणि शिंदे गटापैकी ज्याला तिकीट मिळेल, त्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आहेत, मात्र तेदेखील पवार विरुद्ध पवार अशा भूमिकेत आहेत.