आजोबांना नातेवाईक आणायला गेले तेव्हा ते कोविड सेंटरमध्ये नव्हतेच
विरार (मुंबई): वसई विरार महापालिका (Vasai Virar Municipal Corp) हद्दीत सध्या रूग्णांची संख्या काही अंशी वाढत आहे. तशातच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वरुण कोविड रुग्णालयात (Covid Center) एक चक्रावून टाकणारा प्रकार घडला. कोरोना बाधित (Covid Positive) असलेल्या ८२ वर्षांच्या रुग्णाचा क्वारंटाइन (Quarantine) कालावधी संपणार म्हणून त्याचे नातेवाईक त्याला घेण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमध्ये गेले आणि तेथे जाऊन त्यांना प्रचंड मोठा धक्का (Shocking) बसला. तो रूग्ण काही दिवसांपासून गायब (Missing) झाल्याची माहिती मिळताच प्रचंड खळबळ माजली. ते आजोबा बेपत्ता होण्यामागचं गूढ (Mystery) अखेर उकललं. वरुणमध्ये उपचार घेत असताना आजोबांना 26 एप्रिलच्या मध्यरात्री तुळींज रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी 27 एप्रिलच्या पहाटे त्यांचे निधन (Death) झाले. पण, त्यांच्या नातलगांना याबद्दल काहीच कळवण्यात आले नाही. त्यांना कोरोना असल्याने दास यांच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार उरकून टाकण्यात आले. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा माग काढला तेव्हा हा सारा प्रकार उघडकीस आला. (Vasai Virar Covid Center Shocking Incidence Missing 82 years old Ramchandra Das Mystery solved as he died due to Covid)
दास प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातील गचाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रामचंद्र दास (82) यांना कोरोनाची लागण झाल्याने 22 एप्रिल रोजी रात्री 7:45 वाजता उपचारासाठी महापालिकेच्या वरूण इंडस्ट्रीज येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचाराचे 14 दिवस 5 मे रोजी पूर्ण झाल्यामुळे त्यांना घरी आणण्यासाठी नातेवाईक कोविड सेंटरमध्ये गेले असता रामचंद्र दास सेंटरमध्ये नसल्याचे लक्षात आले. या संपूर्ण प्रकरणात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांनी पाठपुरावा केल्याने हे प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर वसईत एकच खळबळ उडाली होती. आज या प्रकरणी कोविड सेंटरमधील डॉ. विनय सालपुरे यांनी रामचंद्र दास बेपत्ता झाल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पालिकेच्या कोविड सेंटरमधून रुग्ण बेपत्ता झाल्याचे समोर आल्यावर त्यात खासदार किरीट सोमय्या आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि वसई विरार प्रभारी प्रसाद लाड यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले होते.
महापालिकेने याप्रकरणाची चौकशी सुरु केली असतानाच पोलिसांनीही चौकशी सुरु केली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दिवसभर कोविड सेंटरमध्ये तपासणीचे काम केले. यावेळी पोलिसांनी सेंटरमधील 22 एप्रिलपासूनचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच रजिस्ट्ररचीही तपासणी केली. त्याचबरोबर डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि काही रुग्णांचेही जबाब नोंदवण्याचे काम केले. सीसीटीव्ही फुटेजमधून दास यांचा ठावठिकाणा समोर आला.
26 एप्रिलच्या मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास दास यांची प्रकृत्ती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांचे २७ एप्रिलच्या पहाटे निधन झाले. दास यांना वरुणमध्ये दाखल करताना सविस्तर माहिती घेतली न गेल्याने तुळींज रुग्णालय प्रशासन नातेवाईकांपर्यंत पोचू शकले नाहीत. दास यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांचा मृतेदह ठेवता येत नसल्याने प्रशासनाने बेवारस म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांच्या तपासातून दास यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले गेले.दरम्यान दास यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी काढण्यात आलेल्या फोटो मुळे गूढ आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वसई विरार महापालिकेच्या आरोग्य खात्यातील भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे. वरुण कोविड सेंटरमधून रुग्ण दुस-याठिकाणी हलवताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने ट्रान्सफर पेपरच तयार केलेले नव्हते. तसेच तुळींज रुग्णालयातही रुग्ण आणणल्याची नोंद करण्याचे राहून गेल्याची माहिती हाती लागली आहे.
-----
CCTV फुटेजमधून दास यांना वरुणमधून तुळींज रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली. दास यांच्या नातलगांची दुसऱ्या रूग्णालयाला माहिती नसल्याने, कोविडमुळे मृत्यू झाला म्हणून प्रशासनाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. परंतु अंत्यसंस्कार करण्यापूर्वी फोटो सर्व बाबींचा आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
-सतीश लोखंडे, प्रभारी आयुक्त
-----
कोविड सेंटरमधून रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तेव्हा CCTV फुटेजमध्ये रुग्णाला दुस-या रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर केलेल्या चौकशीत दास यांना तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झाला होता, हे लक्षात आले आणि या बेपत्ता प्रकरणावर पडदा पडला.
-विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.