Mumbai News : डांबराच्या रस्त्यावर भेंडीचे उत्पन्न; शेतकऱ्यांची हक्काच्या जागेसाठी लढा

शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या जागेत डांबराच्या रस्त्यावर शेती करत उत्पन्न घेण्यास सुरुवात केली.
Vasar village farmer crop of ladyfinger on road mumbai land dispute midc
Vasar village farmer crop of ladyfinger on road mumbai land dispute midcsakal
Updated on

डोंबिवली - डांबरावर सीमेंट कॉंक्रीटचा मुलामा चढवत रस्ता बनविल्याची टेक्निक आपण आत्तापर्यंत पाहिली आहे. मात्र डांबराच्या रस्त्यावर शेती करत त्यातून भेंडीचे उत्पन्न घेतल्याचा प्रकार वसार गावात उघडकीस आला आहे.

बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळ शेतकरी आणि एमआयडीसी यांच्यात भूसंपादनावरुन वाद असल्याने एक मार्गिका गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जागेत शेती करण्यास सुरुवात करत विविध फळभाज्यांची लागवड रस्त्यावरील शेतीत केली. यातून आता शेतकऱ्यांची भेंडीचे उत्पन्न घेतले आहे. लवकरच कारल्याचे देखील उत्पन्न या शेतीतून घेतले जाणार असून ही शेती पाहून जो तो आश्चर्य व्यक्त करत आहे.

बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावातील शेतकऱ्यांची जमिन एमआयडीसी पाईपलाईन व रस्ता यात बाधित झाली आहे. एमआयडीसीने केलेले भूसंपादन आणि रस्त्यात गेलेली जमिन यात तफावत आढळून आल्याने वसार गावातील शेतकऱ्यांची हक्काच्या जागेसाठी लढा देण्यास सुरुवात केली आहे.

एमआयडीसी प्रशासनासोबत चर्चा करुनही काही तोडगा निघत नसल्याने तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काची जमीन काबिज करत रस्त्यावरील एक मार्गिकाच बंद करुन टाकली. एमआयडीसी अधिकारी हा रस्ता चालू करण्यासाठी अनेकदा आले.

मात्र त्यांच्या कामातील तफावत आणि शेतकऱ्यांच्या विरोध यामुळे त्यांना आल्या पावली माघारे जावे लागले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या जागेत डांबराच्या रस्त्यावर शेती करत उत्पन्न घेण्यास सुरुवात केली.

विविध फळ भाज्यांची लागवड शेतकऱ्यांनी रस्त्यावर केल्याने हा एक चर्चेचा विषय झाला होता. येणारे जाणारे वाहनचालक देखील शेतकऱ्यांच्या या भूमिकेकडे आश्चर्याने पहात आहेत. ही शेती चांगलीच बहरली असून यात कारले आणि भेंडीचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले आहे.

कारल्याच्या वेलीला फुले आली असून कारली त्याला लागतील. भेंडीचे उत्पन्न घेतले असून दोन ते तीन टाईमच्या आमच्या जेवणाची भाजी या उत्पन्नातून निघाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जागा देण्यासाठी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे देखील प्रयत्नशील आहेत.

जुलै महिन्यात आमदार गायकवाड यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्रामस्थांसह भेट घेत यावर तोडगा काढण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार वसार येथील जमिनीची उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करुन महामंडळाच्या प्रत्यक्षात जलवाहिनी व सेवा रस्ता या खालील क्षेत्र वगळता उर्वरीत क्षेत्र वगळणे योग्य असल्यास मूळ मालक व इतर यांना ते परत करण्याचे निर्देश दिले होते.

पंधरा दिवसांत ही मोजणी करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी दिले. मात्र त्याकडे एमआयडीसीने कानाडोळा केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. एमआयडीसीने मोजणी अर्जात फेरफार करत पोट हिस्सा मोजणी अर्ज करुन त्यासंदर्भात ऑनलाईन नोटीस शेतकऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

या पोट हिस्सा मोजणीस आमची हरकत असल्याचे लहू वायले यांनी सांगितले. यामुळे अद्याप या जागेचा तिढा काही सुटलेला नाही. जागेचा तिढा कायम असताना या शेतीत भाज्यांचे उत्पन्न निघाल्याने रस्त्यावरुन जाणारे वाहनचालक आश्चर्य व्यक्त करत आहे.

शेती पेरुन पिक देखील आले, परंतू रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. यावरुन आपले प्रशासन किती तप्तर आहे याची प्रचिती येत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक देतात. ही एक मार्गिका बंद असल्याने या ठिकाणी वाहन कोंडी होते.

आजूबाजूला मोठ मोठे ढाबे असल्याने त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे देखील येथे वाहन कोंडी होते. शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली न लावण्यामागे खरे गणित काय आहे ? याची चर्चा आता रंगू लागली आहे. विधी मंडळ अधिवेशन सुरु असून हा प्रश्न आता तरी निकाली लावला जाणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.