मुंबई : वाशी येथील महापालिका रुग्णालयाच्या शवागरातील मृतदेहाच्या चोरी प्रकरणात शवागरातील कर्मचारी व मृतदेहाची खातरजमा न करता मुस्लिम तरुणावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचा हलगर्जीपणा असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी या दोघांवर ठपका ठेऊन त्यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात शवागरातील मृतदेहांची अदलाबदल झाल्यामुळे हा प्रकार घडला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या इतर कारणांमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचीही कोव्हिड-19 ची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीचे अहवाल मिळण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असल्याने तितके दिवस हे मृतदेह रुग्णालयातील शवागारात ठेवावे लागत आहेत. त्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालयातील शवागारात सध्या मृतदेहांच्या संख्येत वाढ झाली आहे.
त्यामुळे गेल्या आठवड्यात या शवागरातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाली. या अदलाबदलीमुळे काजल सूर्यवंशी (१८) या मृत तरुणीच्या वडिलांना उमर फारुख शेख (२९) या तरुणाचा मृतदेह दिला गेला. मात्र मृत काजलच्या नातेवाईकांनीही त्यांना दिलेला मृतदेह हा काजलचा असल्याची खातरजमा न करता, त्या मुस्लीम तरुणावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
उमर शेख याचे नातेवाईक उमरचा मृतदेह घेण्यासाठी महापालिका रुग्णालयात गेल्यानंतर शवागारातून उमरचा मृतदेह चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वाशी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, कावीळमुळे मृत पावलेल्या दिघा येथील काजल या तरुणीचा मृतदेह शवागारातच असल्याचे तसेच काजलच्या नातेवाईकांनी काजलचा मृतदेह असल्याचे समजून उमरचा मृतदेह शवागरातून नेऊन त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केल्याचे आढळून आले.
या प्रकरणात मृतदेहांची अदलाबदल करणारा शवागरातील कर्मचारी आणि उमर शेख याच्यावर परस्पर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करणारा काजलचा पिता या दोघांचा हलगर्जीपणा असल्याचे आढळून आल्याने वाशी पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
vashi police filed FIR in deadbody exchange case read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.