मुंबई: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये वैद्यकीय स्तरावर अपघाताचे प्रकार वाढत आहेत. भंडारा येथे झालेलं बालमृत्यू प्रकरण खूपच वेदनादायी होतं. त्यानंतर भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील कोविड हॉस्पिटलला आग लागल्याचं प्रकरण घडलं. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रूग्णालयात ऑक्सिजन गळतीचं दुर्दैवी प्रकरण घडलं. हे प्रकरण ताजं असतानाच विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. आतापर्यंत या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असून या घटनेबाबत सर्व स्तरातून शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर भाजपच्या एका नेत्याने संतप्त भावना व्यक्त करत राजेश टोपे यांना घरी पाठवण्याची मागणी केली.
"महाराष्ट्रात कोविड रूग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरू आहे. पण त्याला कारण कोविड नाही. कुठे आगीमुळे मृत्यू होत आहेत तर कुठे ऑक्सिजनमुळे हे रूग्ण मृत्युमुखी पडत आहेत. आज आगीमुळे विरारमध्ये १३ मृत्यू झाले. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा प्रश्न वगैरे न करता ताबडतोब केंद्र सरकार आणि लष्कराची मदत घ्यायला हवी. प्रत्येक कोविड हॉस्पिटल्सचं आता फायर आणि ऑक्सिजन ऑडिट केलं जायलाच हवं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे", अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहोचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यांशी बातचीत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवून आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, चार मजली रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मध्यरात्री ३ च्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे साडेपाचच्या सुमारास आग विझवली. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. हे खासगी रुग्णालय असल्याने या ठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती की नाही, हे पाहून तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.