खोपोलीकर लोकलच्या प्रतीक्षेत! सात महिन्यांपासून नागरिकांची गैरसोय; मोठा आर्थिक फटका

खोपोलीकर लोकलच्या प्रतीक्षेत! सात महिन्यांपासून नागरिकांची गैरसोय; मोठा आर्थिक फटका
Updated on

खोपोली : लॉकडाऊन सुरू झाल्यावर लोकल सेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक होताच मध्य रेल्वेची लोकल सेवा कर्जतपर्यंत सुरू झाली; मात्र खोपोलीकर अद्यापही लोकल सेवा पूर्ववत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यात खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मात्र मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

खोपोली शहरातील हजारो नोकरदार मुंबई, मुंबई उपनगरे, तसेच ठाणे, बदलापूर-अंबरनाथ-डोंबिवली, ऐरोली, नवी मुंबई या भागातील विविध कंपन्या, शासकीय कार्यालये, बॅंका व अन्य खासगी व्यवसाय, उद्योगात नोकरी करतात. तसेच मोठ्या प्रमाणावर या भागातील नोकरदार खोपोली व परिसरातील औद्योगिक क्षेत्रात कामकाजासाठी दैनंदिन स्वरूपात ये-जा करतात. या नागरिकांना कामावर जाण्यासाठी खासगी वाहने किंवा दुचाकीने जावे लागत आहे. यापूर्वी नेहमी महिन्याला 300 ते 400 रुपये खर्च होणाऱ्या ठिकाणी लोकल बंदमुळे तब्बल तीन ते चार हजार रुपये फक्त प्रवासासाठी खर्च होत आहेत. त्यामुळे सात महिन्यांपासून बंद असलेल्या लोकलमुळे खोपोलीकरांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याशिवाय, होणारी धावपळ आणि अन्य समस्या अगणित आहेत. 

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर राज्य सरकारने लोकलला हिरवा कंदील दिला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकल सेवा वाढवण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनही या संदर्भात नियोजन करत असल्याने नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत मध्य रेल्वेची लोकल सेवा मर्यादित स्तरावर फक्त कर्जतपर्यंत सुरू आहे. त्यामुळे खोपोलीकर लोकल सेवेपासून अद्याप वंचित आहेत. खोपोली लोकल सेवा सुरू झाल्यावर या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

कुठे दिलासा, तर कुठे धास्ती... 
सात महिन्यांपासून बंद असलेली खोपोली लोकल सध्या सुरू होण्याच्या मार्गावर असल्याचे चिन्ह दिसत आहेत. तीन दिवसांपासून येथील रुळाची तपासणी करण्यासाठी रिकामी लोकल चालवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे खोपोलीतील नोकरदारांच्या आशा वाढल्या आहेत. तर दुसरीकडे लोकल सेवा सुरू झाल्यावर खोपोली व परिसरात आटोक्‍यात आलेली कोरोनाची स्थिती पुन्हा वाढणार तर नाही ना? याची चिंता येथील नागरिक, प्रशासन व राजकीय नेत्यांना सतावत आहे. 

जनजीवन सुरळीत होण्यासाठी लोकल सेवा नियमितपणे सुरू होण्याची गरज आहे. मात्र, वर्दळ वाढल्यास आटोक्‍यात आलेली कोरोनाजी स्थिती याबाबत चिंता आहे. लोकल सुरू झाल्यास नागरिकांनी व रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. 
- सुमन औसरमल,
नगराध्यक्ष, खोपोली 

Waiting for Khopolikar local train Inconvenience to citizens for seven months Big financial blow

-----------------------------------------------

( संपादन - उमा शिंदे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.