अलिबाग - निसर्गचक्री वादळाच्या संकटामुळे रायगड जिल्हयातील सहा लाख 35 हजार विज ग्राहकांचे नुकसान झाले. दोन महिने होत आली. तरीही दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव या तालुक्यातील सुमारे 53 गावांमध्ये अजूनपर्यंत विजेचा प्रकाश पोहचला नाही. त्यामुळे दक्षिण रायगडमधील सुमारे 31 हजार ग्राहक आजही अंधारात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
निसर्ग चक्रीवादळ तीन जून रोजी रायगड जिल्हयात येऊन धडकले. या वादळात घरांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्यूत वितरण विभागाचेही प्रचंड नुकसान झाले. अलिबागसह पेण, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, तालुक्यातील सुमारे सहा लाख 35 विज ग्राहकांना मोठा फटका बसला. तारा तुटणे, पोल वाकणे, पोल पडणे, रोहीत्र खराब होणे अशा अनेक कारणांमुळे विज पुरवठा सुरळीत करणे विद्यूत वितरण कंपनीसमोर आव्हान होते. रायगड जिल्हयासह नाशिक, ठाणे व अन्य जिल्हयातील विद्यूत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ही सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी ग्रामस्थांनी पुढाकार घेत विद्यूत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे आतापर्यंत रायगड जिल्हयातील 6 लाख चार हजार ग्राहकांपर्यंत विद्यूत सेवा पुर्ववत सुरु करण्यास विद्यूत वितरण कंपनीला यश आले. परंतू अजूनपर्यंत 31 हजार ग्राहक अंधारात आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 23, म्हसळा तालुक्यातील 19, तळा तालुक्यातील सहा व माणगाव तालुक्यातील 5 पाच गावांचा समावेश आहे. घरांमध्ये विज नसल्याने मेणबत्ती, दिवाबत्ती लावून रात्र काढण्याची वेळ येथील गावांतील नागरिकांवर आली आहे. काही ठिकाणी रॉकेलवर चालणाऱ्या कंदीलवर येथील ग्रामस्थ दिवस ढकलत आहेत. विज नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
गणपतीचा सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे विद्यूत सेवा कधी सुरु होईल असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या दक्षिण रायगडमधील चार तालुक्यातील काही भाग खाडीबरोबरच जंगल भागात असल्याने या मार्गावरून विद्यूत पुरवठा सुरळीत करताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात मुसळधार पावसासह रिमझीम पाऊस पडत असल्याने काम करण्यास अडथळे निर्माण होत आहे. रायगड जिल्हयासह भांडूप येथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यूत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. सुमारे एक हजार 200 कर्मचारी काम करीत असल्याचे विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दक्षिण रायगड जिल्हयात विज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यासाठी रायगड जिल्हयासह भांडूप विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. युध्द पातळीवर काम सुरु असून लवकरच विज सुरळीत करून या गावांमध्ये प्रकाश आणला जाईल.
दिपक पाटील -
अधीक्षक, विद्यूत वितरण कंपनी
-------------------------------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.