मुंबई : शहरातील कामे, त्यांचा दर्जा व भ्रष्टाचार, उद्यानांचे व पुलांचे नामकरण आदी मुद्यांवर संघर्ष झाल्यानंतर सेना-भाजपच्या (Bjp - shivsena)महिला नेत्यांमध्येही आता वाकयुद्ध पेटले आहे. भाजप नेत्यांना मूळव्याध सतावतो आहे का, या महापौरांच्या(kishori pednekar) टीकेला, सेनेची अवस्था सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी झाल्याचे उत्तर भाजप मुंबई महिला मोर्चा अध्यक्षांनी दिले आहे. फक्त शोभेचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या हाती असून सत्तेच्या चाव्या मात्र राष्ट्रवादीकडेच आहेत. त्यामुळे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था झालेले शिवसेनेचे काही नेते रोज भाजपला लाखोली वाहून राग काढत आहेत, अशी जळजळीत टीका मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई(shital desai) यांनी केली आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने भाजपला मूळव्याध सतावतो आहे का, अशी बोचरी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती. त्यासंदर्भात श्रीमती देसाई यांनी वरीलप्रमाणे टीका केली आहे. मूळव्याध झालेल्यांचीच अवस्था सहन होत नाही अन सांगताही येत नाही अशी होते. शिवसेनेच्या हाती फक्त रिकामा खोका देण्यात आला आहे, सत्तेचे लोणी अन्य कोणीतरी पळवले आहे, हे सेनानेत्यांचे खरे दुःख आहे, असा टोलाही श्रीमती देसाई यांनी लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सेनेच्या आमदारांच्या जागांमध्ये घटच होत गेली. दुसरीकडे जनतेत लोकप्रीय ठरल्याने भाजपच्या जागा वाढत गेल्या, त्या जळफळाटातून भाजपला अपशकून करायचा या एकाच हेतूने शिवसेनेने अनैसर्गिक युती केली. मात्र हाती फारसे काहीही लागले नाही, केवळ शोभेचे मुख्यमंत्रीपद मिळाले. पण सारे अधिकार बारामतीकरांच्या हाती गेले. महत्वाची खाती आणि आर्थिक तरतूदी जास्तकरून राष्ट्रवादीच्याच खात्यांना आणि आमदारांच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे आता शिवसेनेला तोंड दाबून बुक्य्यांचा मार सहन करावा लागतो आहे, अशी उपहासात्मक टीकाही श्रीमती देसाई यांनी केली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी वाटेल तशा कोलांट्याउड्या मारल्या, पण आता बडा घर पोकळ वासा अशी अवस्था झाल्याची प्रचिती शिवसेनेला येत आहे. नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, गाढवही गेले अन ब्रह्मचर्यही गेले, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले, या अशा शाळेत शिकलेल्या म्हणींचा अर्थ आता शिवसेना नेत्यांना कळू लागला आहे. मात्र हा धोंडा त्यांनीच आपल्या पायावर मारून घेतला आहे. त्यामुळे आता नशिबाला दोष देण्याखेरीज त्यांच्या हातात काहीही उरले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एकदा पुढे टाकलेले पाऊल दलदलीत खोल खोल फसत चालले असून त्यामुळे पुढेही जाता येत नाही व पाऊल मागेही घेता येत नाही अशा विचित्र चक्रव्यूहात शिवसेना(shivsena) फसली आहे, असा टोमणाही देसाई(bjp) यांनी मारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.