मुंबई : कोरोनाची साथ कधी नियंत्रणात येईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. या परिस्थितीत पर्यटनाची आशा तरी काय बाळगणार. त्यामुळे अनेक पर्यटक आपले पॅकेज रद्द करुन पैसे देण्याची मागणी करीत आहेत. सुमारे पाच हजार पर्यटकांनी एकत्रितपणे आरक्षित केलेली 1400 ट्रॅव्हल पॅकेज रद्द करण्याचा आग्रह केला आहे आणि त्यामुळे एकंदर 45 कोटींच्या परताव्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई ग्राहक पंचायतने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहीती समोर आल्याचे समजते. ट्रॅव्हेल पॅकेजसाठी भरलेले पैसे परत नसल्याच्या तक्रारी आल्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार सुमारे 1 हजार 423 जणांनी 5 हजार 31 पर्यटकांसाठी हे पॅकेज आरक्षित केले होते. पर्यटनास जाणाऱ्यात 3 हजार 54 बुजुर्ग पर्यटकही होते. त्यातील 75 टक्के आंतरराष्ट्रीय आहेत. एकंदर 1 हजार 71 जणांनी या सर्वेक्षणास प्रतिसाद दिला. त्यानुसार 406 जणांनी व्हिसा मिळवला होता, तर 183 जणांपैकी काहींनी आपल्या काही पर्यटकांच्या व्हिसाची प्रक्रिया पूर्ण केली होती.
आता पॅकेज आरक्षित केलेल्या एक हजार 423 पर्यटकांपैकी 1 हजार 115 जणांनी रकमेचा परतावा करण्याची मागणी केली आहे. त्यापैकी 71 टक्के जणांना क्रेडिट शेलचा प्रस्ताव देण्यात आला. 165 जणांनाच ऑपरेटरना रक्कम परतावासाठी तयार करता आले आहे. अर्थात रक्कम परतावाही पूर्ण मिळण्याची शक्यता कमी आहे. काहींनी नियमावर बोट ठेवत 55 टक्के रक्कम कापून घेणार असल्याचे सांगितले आहे. 294 जणांनी आपल्याला पूर्ण रकमेचा क्रेडिट शेल मिळत असल्याचे सांगितले, तर 811 जणांनी क्रेडिट शेलही कॅन्सेलशन चार्जेस वजा करुन दिला जाणार आहे.
जपान टूरसाठी एका बुजुर्ग दांपत्याने 3 लाख 42 हजार भरले होते. त्यांना टूर ऑपरेटरने क्रेडिट शेल देताना वीस हजार रुपये कमी देणार असल्याचे सांगितले. त्यांनी आम्हाला ही रक्कम पुढील वर्षाच्या टूरसाठी वापरता येईल असे सांगितले आहे. मात्र पुढील वर्षीही सहलीला जाता येईल याची हमी काय अशी विचारणा त्यांनी केली. क्रेडिट शेल अर्थात पुढील वर्षाच्या टूरसाठी आगाऊ रक्कम कशी स्वीकारणार, नव्या वर्षातही सर्व सुरळीत होईल याची खात्री काय अशी विचारणा होत आहे. काहींनी आपल्या नातेवाईक किंवा मित्रांसाठी ही पॅकेज देता येईल का अशी विचारणा केली आहे.
मुंबई ग्राहक पंचायत हा प्रश्न आता सरकारकडे नेण्याचा विचार करीत आहे. क्रेडिट शेल अर्थात भविष्यातील टूरची रक्कम केवळ एका वर्षासाठीच असेल असे सांगितले जात आहे. त्यामुळेही अनेक जण नाराज आहेत. योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसेल असे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.