मुंबई - सौम्य लक्षणे असलेल्या हाय रिस्क कोव्हिड-१९ रुग्णांवर (Covid-19 Patient) उपचार (Treatment) करण्यासाठी मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपी (Monoclonal Antibody Therapy) ही नवसंजीवनी (Revitalization) देणारी थेरपी ठरली आहे. या उपचारपद्धतीने नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटीमध्ये चार रुग्णांच्या प्रकृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून आली. अनेक सहआजार असलेल्या व्यक्तींवर 1 जूनपासून या थेरपीचा वापर करून उपचार करण्यात आले. या रुग्णांपैकी दोन रुग्ण अत्यंत स्थूल होते आणि त्यांचा बीएमआय 45 हून अधिक होता. (What is Monoclonal Antibody Therapy Revitalization for Coronary Heart Disease)
काय आहे मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपी ?
मोनोक्लोनल अँटिबॉडी ही प्रयोगशाळेत तयार केलेली प्रथिने असतात. आजार होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घातक घटकांशी लढा देण्याची रोगप्रतिकारक क्षमतेप्रमाणे ही प्रथिने कार्य करतात. कॅसीरीवीमॅबआणि इम्डेवीमॅब या त्या दोन मोनोक्लोनल अँटिबॉडी असून त्यांना सार्स कोविड 2 च्या स्पाइक प्रोटिनविरुद्ध काम करण्यासाठी निर्देशित केलेले असते आणि विषाणूचा मानवी शरीरात प्रवेश आणि विषाणूला मनावी पेशींपासून दूर राहण्याच्या दृष्टीने त्यांची रचना केलेली असते. परिणामी रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते.
फेब्रुवारी 2021 मध्ये यूएस. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने सौम्य ते मध्यमस्वरुपाची कोविड 19 ची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अँटिबॉडी कॉकटेलच्या वैद्यकीय तातडीच्या वापरासाठी (ईमर्जन्सी युझ ऑथोरायझेशन - ईयूए) परवानगी दिली. म्युटेशन कमी करण्यासाठी मे 2021 मध्ये भारतात या उपचारपद्धतीची सुरुवात करण्यात आली.
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सलील बेंद्रे यांनी सांगितले की, 58 वर्षीय, स्थूल, दीर्घकालीन धुम्रपानाचे व्यसन असलेल्या 130 किलो वजन (बीएमआय 46) असलेल्या आणि गंभीर स्वरुपाचा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया सिंड्रोम असलेल्या व्यक्तीला 2 जून रोजी अँटिबॉडी कॉकटेल देण्यात आले. हे घेणारी ही पहिलीच व्यक्ती होती. उच्च जोखीम असलेला हा रुग्ण होता. या व्यक्तीला हायपोक्सिया नव्हता, मात्र, अंगात सौम्य स्वरुपाची कणकण होती. 30 मे रोजी रुग्णाची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे, गंभीर स्वरुपाच्या कोविड 19 चा अंदाज बांधून आम्ही मोनोक्लोनल कॉकटेल उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढील 48 तास रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले आणि मग त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णाला असलेल्या सहआजारांमुळे त्याला गंभीर स्वरुपाचा कोविड 19 होण्याची शक्यता होती. पण, दोन आठवड्यांनतर त्याची प्रकृती स्थिर आहे आणि त्याच्यात कोणतीही लक्षणे नाहीत.
अजून एका 50 वर्षीय, खाटेला खिळलेल्या 125 किलो वजनाच्या (बीएमआय 45), पोलियोमायलायटिस, हायपरटेन्शन आणि बॉर्डरलाइन मधुमेह असलेल्या महिलेच्या प्रकृतीमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली.
एंडोक्रिनोलॉजी आणि डायबेटोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. गिरीश परमार या महिलेवर उपचार करत होते. ते म्हणाले की, कोव्हिडचा संसर्ग झाल्यानंतर सातव्या दिवशी ही महिला हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. रुग्णामध्ये खोकला आणि तापाची सौम्य लक्षणे होती. ती उच्च जोखीम असलेली रुग्ण असल्यामुळे आजार बळावण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच 9 जून रोजी तिला मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले. सध्या या महिलेमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत आणि तिची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे.”, असे डॉ. परमार म्हणाले.
या व्यतिरिक्त अनियंत्रित मधुमेह व हृदयविकार असलेली 50 वर्षांची महिला आणि हायपरटेन्शन आणि सात दिवस सतत ताप असलेल्या 57 वर्षीय पुरुषालाही हे अँटिबॉडी कॉकटेल देण्यात आले. दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती. त्यांना सहआजार असूनही मोनोक्लोनल अँटिबॉडींमुळे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा दिसून आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.