Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर आज उचलबांगडी करण्यात आली. सचिन वाझे प्रकरण, अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांचा मुद्दा आणि इतर काही वादग्रस्त मुद्द्यांची चर्चा पाहता परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना मुंबईचे नवे पोलीस कमिशनर नियुक्त करण्यात आले. हेमंत नरगाळे यांनी अनेक हाय प्रोफाईल केसमध्ये तपासात मोलाचा वाटा उचलला आहे. १९९८ ते २००२ या काळात सीबीआयसाठी मुंबई व दिल्लीत काम पाहिलं. 'सीबीआय'च्या सेवेत असताना हेमंत नगराळे यांनी बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा आणि नुकताच SCAM 1992 या वेब सिरीजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला हर्षद मेहता घोटाळा अशा बड्या प्रकरणांच्या चौकशीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जाणून घेऊया या हेमंत नगराळेंबद्दल सविस्तर माहिती...
सर्वात महत्त्वाची बातमी: हेमंत नगराळे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नगराळे हे स्वत: मेकॅनिकल इंजिनीअर असून त्यांनी फायनान्स मॅनेजमेंट या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९८७ च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले हेमंत नगराळे हे सध्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. पण सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीसांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नगराळेंनी IPS अधिकारी म्हणून अनेक जिल्ह्यांत काम पाहिले आहे. याशिवाय, त्यांनी दिल्लीतही आपलं कर्तव्य बजावलं आहे.
कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी करत असताना दरम्यान त्यांची ओळख तत्कालीन पोलीस अधिकारी पुरुषोत्तम चौधरी यांच्याशी झाली. त्यांनी नगराळे यांना पोलीस दलात अधिकारी पदासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला. हेमंत यांनी युपीएससीची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. १९८७ साली त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. १९९२च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती त्यांनी योग्य पद्धतीने आणि सक्षमपणे हाताळली. १९९४ ते १९९६ या काळात रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधित भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलं. १९९६ ते १९९८ मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली. राज्यव्यापी MPSC पेपरफुटी प्रकरणाची चौकशी त्यांनी केली होती.
२०१६मध्ये हेमंत नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण खूप गाजले. या दरोड्याची देशभर चर्चा झाली. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला होता. तसेच कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही नगराळे यांनी केली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गावित हिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत त्यांनी बारकाईनं केलेल्या तपासाचं कौतुक झालं होतं. वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांना तडकाफडकी बदलल्यानंतर आता मुंबईची सूत्रे हेमंत नागराळे यांच्याकडे गृहमंञ्यांनी सोपवली आहेत.
दरम्यान, हेमंत नगराळे हे एका क्रीडा महाविद्यालयात ज्यूडोचे प्रशिक्षण घ्यायचे. ज्यूडोत त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. राष्ट्रीय पोलीस स्पर्धेमध्येही त्यांनी पदक मिळवलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.