मुंबई- भाऊ-बहिणींच्या पवित्र बंधनाचा रक्षाबंधन सण १९ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या संदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे या जर मुंबईमध्ये असतील तर त्यांच्याकडून राखी बांधून घेईन, असं ते म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
मी उद्या मुंबईमध्ये आहे. माझा जन सन्मान कार्यक्रम मुंबईमध्ये आहे. त्यामुळे माझ्या ज्या बहिणी मुंबईमध्ये आहेत. त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधून घेणार आहे. सुप्रिया सुळे या मुंबईत असतील तर त्यांच्याकडूनही राखी बांधून घेऊन, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र, सुप्रिया सुळे या उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.