डोंबिवली : प्रेमसंबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढत त्याची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर पत्नी व तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाला नायलॉनच्या दोरीने दगड बांधून मृतदेह विहिरीत ढकलला. यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात जात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
मात्र विहिरीतून मृतदेहाचा हात वर आला आणि हत्येचा उलगडा झाला. मानपाडा पोलिसांनी शिताफीने पत्नीची विचारपूस केली असता प्रियकरासह तिने पतीचा खून केल्याची कबुली दिली. रिता चंद्रप्रकाश लोवंशी व तिचा प्रियकर सुमित राजेश विश्वकर्मा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. लहानपणापासूनचे प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आडिवली गावातील विद्याधर वझे यांच्या मालकीच्या विहिरीत 25 जानेवारीला एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पाण्यात माणसाचा हात तरंगत असल्याची माहिती वझे यांनी मानपाडा पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस निरिक्षक संपत फडोळ, निशा चव्हाण, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. विहिरीतील पाण्यातून एका पुरुषाचे प्रेत बाहेर काढण्यात आला. मयताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरु केले असता मृतदेहाशी मिळता जुळता व्यक्ती 20 जानेवारीला दावडी गावातील चंद्रप्रकाश लोवंशी (वय 32) हे बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. सदरचा मृतदेह हा चंद्रप्रकाश यांचाच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
मयत चंद्रप्रकाश यांचा गळा धारदार हत्याराने चिरलेला असून त्यांच्या पाठीवर आणि उजवे पायाचे गुडघ्यावर जखमा असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याचे कमरेस नायलॉनची दोरी आणि केबल वायरचे सहाय्याने मोठ्या आकाराचा दगड बांधून प्रेत विहिरीतील पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यानुसार मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मयतची पत्नी हीची विचारपूस केली असता तिने सुमित याला सर्व माहिती असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सुमितला ताब्यात घेतले असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिता आणि सुमित यांचे लहानपणापासून प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच चंद्रप्रकाश यांचा खून केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे दोघेही चंद्रप्रकाश याच्या हत्येचा प्लॅन करत होते. 20 जानेवारीला हत्या करायची तसेच कोणत्या वेळी हे ही त्या दोघांनी निश्चित करुन ठेवले होते. त्यानुसार दोन अल्पवयीन मित्रांच्या साथीने त्यांनी चंद्रप्रकाश याचे तो कामावरुन परतत असताना अपहरण केले. त्याला जबरदस्तीने इको कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेले.
तेथे त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरुन व पाठीवर, गुडघ्यावर वार करुन जिवे ठार मारले. पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री दीडच्या सुमारास त्याचा मृतदेह डोंबिवली आडीवली गावात एका विहिरीजवळ नेला. त्यानंतर मृतदेह दगडांनी बांधून विहिरीत फेकून दिला. त्यानंतर पत्नी रिता ही स्वतः पोलिस ठाण्यात गेली व चो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
यातील दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रिता व सुमित यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 1 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.