योग ‘ऊर्जा’ : रोगप्रतिकारकशक्तीसाठी प्राणायाम व ध्यान

Yoga
Yoga
Updated on

मागील लेखात आपण आसनांचे व शुद्धीक्रियांचे महत्त्व पाहिले, आता प्राणायाम व ध्यान आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास कसे उपयोगी ठरतात, ते पाहू.  प्राणायामाच्या स्ट्रेस कमी करणे आणि श्वसन संस्थेचे आरोग्य या दोन मुख्य फायद्यांवर बोलू!

स्ट्रेस कमी करण्यासाठी - आपल्या मेंदूतील वैचारिक आणि भावनिक केंद्रे स्ट्रेसमुळे कायम उत्तेजित असतात. त्यांना शांत करणे आणि रक्तातील रासायनिक समतोल राखणे महत्त्वाचे आहे. कारण स्ट्रेसमुळे सर्व आंतरिक इंद्रियांवर अतिरिक्त भार पडतो आणि त्यांचे ठरलेले काम उत्तम प्रकारे होत नाही. हे दीर्घकाळ चालू राहिल्यास अनेक रोगांचा शिरकाव सुरू होतो. स्ट्रेसमुळे रक्तात कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढून रोगप्रतिकारक यंत्रणेवर घाला घालतो. भीती, भावनिक चढ-उतार प्रतिकारशक्ती कमकुवत करतात.

प्राणायाम : दीर्घ श्‍वसन (Slow deep breathing), अनुलोम-विलोम, भ्रामरी.
श्वसन संस्थेसाठी - आपल्या फुफ्फुसांची क्षमता सहा लिटर हवा भरण्याची असते, परंतु आपण नेहमी घेत असलेले उथळ श्वास साधारण ५०० मि.ली असतात. फुफ्फुसांच्या कमी वापरात असलेल्या भागात संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. वर्षानुवर्षे आपल्या फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्‍साईड आणि घाण साचलेली असते. प्राणायामाने ती बाहेर फेकली जाते आणि पुन्हा नवीन स्वच्छ हवा भरली जाते. फुफ्फुसांची क्षमता आणि लवचिकता (elasticity) प्राणायामाने वाढते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने सर्व इंद्रिये रिफ्रेश होतात. 

प्राणायाम - दीर्घश्वसन, उज्जयी, कपालभाती, भस्त्रिका
प्राणायामाने आपल्या शरीरातील सर्व अवयव, प्रत्येक पेशी आणि मेंदू यांचे पोषण होत असते. दीर्घकाळापर्यंत निरोगी राहण्यासाठी रोज प्राणायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

ध्यान
आता ध्यानाबद्दल बोलू! आपण दिवसभर काही ना काही कार्य करत असतो. काहीकाळ कुठलेही कर्म न करण्यात खरे म्हणजे एक वेगळीच गोडी आहे. काही करायचे नाही, म्हणजे नक्की काय करायचे? तर शरीराने आणि मनानेही कुठलेच कर्म करायचे नाही. ही स्थिती ध्यानात अनुभवता येते. ध्यान सर्वसाधारणपणे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाते, बहुतेक यामुळे अनेकजण यापासून लांब राहतात. परंतु, ध्यानप्रक्रियेची शास्त्रीय उपयोगिता पाहिल्यास अनेकजण ध्यान करायला सुरुवात करतील. शरीराच्या अनेक व्याधी मनाच्या विस्कळीत कार्यामुळे होतात.

दृश्यस्वरूपात शरीरावर याचे प्रकटीकरण होत असते. स्ट्रेस, सतत डोक्यात सुरू असलेला विचारांचा गदारोळ, चिडचिडेपणा, भीती, आकांक्षा-अपेक्षांचे ओझे आदी अनेक कारणांनी मेंदू सतत गुंतून राहतो, थकतो. पण त्याच मेंदूवर आपल्या शरीराचे इतर सर्व कार्य सुरळीत ठेवण्याचीही जबाबदारी असते. म्हणूनच आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित, सुसंवादी ठेवणे व्याधीरहित जीवनाचे गमक आहे. नियमित ध्यान केल्याने मेंदूतील वैचारिक व भावनिक केंद्रे शांत राहतात. या शांततेत झालेले मेंदूचे कार्य उच्चदर्जाचे असते. प्राणायाम व ध्यानाने मेंदूचे अक्षरशः reprogramming आणि reconditioning होऊन मेंदूत सूक्ष्म बदल होऊ लागतात.

  • ध्यानाने रक्तातील स्ट्रेस हॉर्मोन ‘कॉर्टिसोल’ आणि ‘कॅटेकोलोमीन’ यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे, रक्तातील रासायनिक समतोल साधला जातो. 
  • ध्यानाने ‘प्रोलॅक्टीन’ हॉर्मोन वाढते. ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुरळीत ठेवते.
  • ‘अँटीबॉडी टायटर’ वाढतात. ज्यामुळे, रोगांवरचे उपाय आणि इलाज यांना आपले शरीर चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकते.
  • नियमित ध्यानामुळे आपल्या मेंदूतील ‘अमिग्डाला’ नावाचे चिंता, भीती, काळजीचे केंद्र शांत राहते.

हठयोगातील शुद्धीक्रिया, आसन, प्राणायाम ध्यानाचा दर्जा वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील. आपली प्रतिकार शक्ती किंबहुना शरीराच्या सर्वच कार्याचे आरोग्य दडलेय ते शरीर व मनाच्या सुसंवादात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.