आपल्या सगळ्यांना महत्त्व हवं असतं. माणसाला ‘मी कुणीतरी विशेष आहे’ असं वाटून घ्यायला आवडतं. पण आपल्याला हा ‘स्पेशल स्टेटस’ का मिळावा? तसं काहीतरी काम आपण करत असू, स्वतःच्या पलीकडं समाजासाठी काही करत असू किंवा आपला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात इतरांना उपयोग होत असला तरच. त्यासाठी खूप पैसे असायची, आपल्या नावाची चॅरिटी फाउंडेशन असायची गरज नाही. तुम्ही जिथं आहात तिथं, जसे आहात तसे आणि तुमच्याकडं आहे त्यानं इतरांच्या आयुष्याला हातभार लावता येतो. इच्छा मात्र हवी. ज्यांची इच्छा कमालीची असते, पण ती टिकत नाही किंवा स्वतःच्या आयुष्याच्या प्रवाहात या इच्छा मागे पडून जातात त्यांना आणखी जागरूकतेने जगण्याची गरज आहे.
Life happens in the in-between
आपल्यासाठी जी गोष्ट सर्वसाधारण असते, ती कोणासाठी तरी खूप मोठी असू शकते. घरात फळे-ड्रायफ्रूट असणं, दारात गाडी, उंची कपडे, वाचायला पुस्तके, फ्रिज, पंखा, एसी, एक फोन फिरवून होणारी कामं... अनेकांकडं यातलं काहीच नसतं. जगताना आपल्या आजूबाजूच्यांसाठी कशा पद्धतीची छोटी छोटी मदत होऊ शकते, याकडं पाहावं. आपल्या गरजेपुरतं आपण जगत राहिलो, तर आपण स्वार्थी व संकुचित ठरू. तुमच्यापैकी काहींना वाटेल की ‘मी माझ्या कष्टाचं जगतोय ना, मग मला हवं ते मी का करू नये?’ मला सांगा शाळा-कॉलेजमध्ये तुमच्या खिशात पैसे नव्हते तेव्हा तुम्हाला किती जणांची मदत मिळाली? कोणीतरी लिफ्ट दिली, कोणीतरी नोट्स दिल्या, विषय समजावून देण्यात मदत मिळाली. घरकाम करणाऱ्या मावशी, वॉचमन काका, ड्रायव्हर काका हे त्यांच्या कामापलीकडं जाऊन एक्स्ट्रा काम करतात, कारण आपण त्यांच्याकडून फेवर घेत असतो. मग आपण मोठे होतो, सक्षम होतो तेव्हा आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी ठरलं पाहिजे, नाहीतर स्वार्थीपणे स्वतःसाठी जगत राहू. इतरांचं आयुष्य सुलभ व्हावं असा विचार करावा.
देता हात
मी खूप सुंदर वाक्य ऐकलं होतं, ‘योगी व्हायचं असल्यास आधी उपयोगी बना.’ ‘मी’, ‘माझं’च्या पलीकडं जगा. अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, ज्ञानदान, प्राणी व पक्ष्यांसाठी प्यायला पाणी ठेवणं, रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी खायला देणं, मुलांसाठी काहीतरी करणं, वृद्धांना लिफ्ट देणं... अशा कित्येक प्रकारे आपण उपयोगी पडू शकतो. आपल्या आजूबाजूला बरंच काही चालू असतं, त्याकडे डोळे व कान उघडे ठेवून आणि मन मोठं ठेवून जगलो तर खूपदा संधी मिळेल आपण उपयोगी बनण्याची. शिळं अन्न, फाटक्या-तुटक्या वस्तू देऊ नये, दानाचा गर्व असू नये. विनोबा भावेंकडं त्यांच्या वडिलांनी एका गरजू विद्यार्थ्याला राहायला आणलं होतं. विनोबांची आई त्या मुलाला ताजं अन्न खाऊ घालायची आणि शिळं-उरलेलं स्वतः खायची किंवा जास्त असल्यास विनोबांना द्यायची. त्यावर विनोबा आईला म्हणाले, ‘तू आम्हा सर्वांना समान वागणूक देत नाहीस, त्याला वेगळं आणि मला वेगळं का?’ त्यावर त्यांची आई म्हणाली, ‘खरं आहे विन्या तुझं, तू माझा मुलगा आहेस; पण त्या मुलामध्ये मी देव पाहते.’ ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीत जन्माला आलेले आपण, आपलं बहुतेक आयुष्य ‘मी’पणात घालवतो.
सांगलीचे प्रसिद्ध कै. धनी वेलणकर रोज विलिंग्डन कॉलेजपर्यंत फिरायला जायचे आणि येताना बस स्टॉपवर ताटकळलेल्या विद्यार्थ्यांना गावात गाडीने आणून सोडायचे. असे मी माझ्या आजोबांकडून ऐकलं होतं. कोणताही आविर्भाव न ठेवता इतरांसाठी असंच सहज कर्म व्हां.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत
रोज रात्री बिछान्यावर पडल्यावर विचार करा, की मी आज स्वतःपलीकडं कोणासाठी उपयोगी ठरलो? आणि सकाळी उठून पुन्हा ठरवा आज मी त्यासाठी काय करू शकतो? अशानं आपल्या बरोबरीने आजूबाजूच्यांचेही आयुष्य चार पावले पुढे जायला मदत होईल. निस्वार्थीपणानं केलेल्या अशा कर्माने समाधान नक्कीच मिळेल...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.