इंग्रजीमध्ये ‘रेड फ्लॅग’ अशी संकल्पना आहे. लाल रंग धोका किंवा संकटाचं प्रतीक समजला जातो. ‘Red flags in relationships’ म्हणजे नात्यांमध्ये अशा काही गोष्टींची चाहूल, ज्या नात्यांना पुढं जाऊन धोकादायक ठरू शकतात. जसं व्यसन, अति राग, असूया, नात्यांमधल्या मर्यादा न ओळखणे इत्यादी. ‘रेड फ्लॅग’ ओळखणं म्हणजे वेळेतच या चुकीच्या वागणुकीची चाहूल ओळखणं किंवा त्या वाढून मोठे संकट येऊ नये, यासाठी पटापट पावलं टाकणं. पण, आज नात्यांमधल्या ‘रेड फ्लॅग’बद्दल मी बोलणार नाहीये.
खरंतर असे ‘रेड फ्लॅग’ आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या स्वतःच्या आतमधेच अनेक असतात. वादळ येऊन गेल्यावर पुनर्स्थापना करणं जास्त अवघड असतं, त्यापेक्षा वादळ येण्यापूर्वीच पावलं उचलल्यास हानी कमी प्रमाणात होते. आपल्या जीवनात असे कोणते रेड फ्लॅग आहेत, जे पुढं मोठी हानी होऊ नये यासाठी आपलं शरीर व मन आपल्याला छोटे छोटे सिग्नल्स किंवा वॉर्निंग साइन्स, सौम्य प्रमाणात धोक्याची सूचना अगोदरच आपल्याला देत असतात.
१. झोपेचा त्रास : झोप न येणे, रात्रभर तुटक झोप असणे, झोपेची क्वॉलिटी चांगली नसणे, सकाळी फ्रेश न वाटणे
२. ॲसिडिटी, डोकेदुखी : वारंवार ॲसिडिटी होणं व त्यामुळं डोकेदुखी, ढेकर, अस्वस्थपणा येणं.
३. अपचन, बद्धकोष्ठता : वारंवार पचनाचे विकार आल्यानं त्याचे पुढं जाऊन क्लिष्ट आजारांमध्ये रूपांतर होते
४. श्वासाचा त्रास : आपला श्वास संथ व लयबद्ध असला पाहिजे. जलद श्वसन आणि छाती जड वाटून श्वास पुरत नाही असं वाटणं.
५. वजन वाढणे : स्थूलता खरंतर एक आजार आहे, याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे
६. पोश्चर बिघडणे, पाठदुखी : सतत बसणं, चुकीचं बसणं-झोपणं यामुळं मान-पाठदुखी अनेकांना होत असते. पुढं झुकलेले पोश्चर म्हणजे मान, खांदे, पाठ पुढं झुकणं यांकडं दुर्लक्ष करू नये
७. पॅल्पिटेशन : स्ट्रेस, टेन्शन, चिंता, काळजी, अति चहा-कॉफी यामुळं होणारी छातीतली धडधड याकडं दुर्लक्ष करू नये
८. नैराश्य, चिडचिड, ध्येयहीन वाटणं : आपण जे काही करतो, त्यानं आपल्याला आनंद मिळेल अशा अपेक्षेनं आपण ते करतो. पण त्या गोष्टी करण्याच्या किंवा काही गोष्टी मिळवण्याच्या नादात आनंद मागेच पडतो आणि आपण तोच हरवून बसतो
हे काही मोजके रेड फ्लॅगज् आहेत, असे अनेक सापडतील जर तुम्ही तुमच्या आतच शोधले तर! मी फक्त विचारांना चालना देण्यासाठी या आठ गोष्टी लिहिल्या आहेत. शरीर आपल्याशी बोलत असतं ते फक्त ऐकता आलं पाहिजे.
गाडी साधी असो किंवा लक्झरी, ती चांगली चालली तर त्याला अर्थ आहे. तसंच शरीर नुसतं असून उपयोग नाही, तर ते नीट चाललं पाहिजे. शक्य तितका काळ त्यात काही बिघाड होऊ नये यासाठी शरीर आपल्याला अनेकदा वॉर्निंग देत असतं. आपण त्याकडं दुर्लक्ष करतो आणि सहन होईना झालं की गोळी घेतो. अशी तेवढ्यापुरती डागडुजी करण्याची वृत्ती आता सोडू या. आतूनच बळकट होऊ या. आरोग्याबाबत शॉर्ट टर्म विचार नको.
वर दिलेल्या सर्व सूचना तुमचं शरीर तुम्हाला वेळोवेळी देत असतं. ते ओळखून त्यावर तातडीनं उपाय केले पाहिजेत. हे उपाय जीवनशैलीत बदल, सवयी, व्यायाम, योगासनं, प्राणायाम, ध्यान आणि मुळात म्हणजे जागरूकतेनं जीवन जगण्यानं होणार आहेत. त्रास विकोपाला गेल्यास वैद्यकीय मदत घ्यावी लागणारच आहे.
परंतु, त्रासांनी त्यांची मर्यादा ओलांडू नये यासाठी तुम्ही घरच्या घरी बरंच काही करू शकता. योगिक जीवन जगणं म्हणजे सर्व आचार, विचार, आहार, विहार यांच्यात योग कसा उतरवता येईल हे योग्य मार्गदर्शकांकडून समजून घ्या, म्हणजे शरीरिक-मानसिक व्याधी खूप काळ त्यांचं अस्तित्व दाखवणार नाहीत...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.