शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने हवे योग्य अन्न...

dr shri balaji tambe tips for helath and good food
dr shri balaji tambe tips for helath and good food
Updated on

विरोधी अन्न सेवन करणे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नसते. विरोधी अन्न सेवन केल्यास काही जणांमध्ये वजन कमी होत जाते, तर काहींमध्ये पदार्थांच्या गुणदोषानुसार वजन वाढतेही. असा लठ्ठपणा कमी करणे अवघड होऊन बसते. काळ हा बहुतेक वेळा आहाराच्या बाबतीत विरोधी होऊ शकतो. काही गोष्टी सकाळी खाणे हे विरोधी आहारात मोडत असेल, तर काही गोष्टी रात्री खाण्याने त्या विरोधी आहारात मोडत असतील. एरवी पूरक असणाऱ्या काही गोष्टी समप्रमाणात सेवन केल्यास त्या विरोधी बनतात.

जन्मजात शत्रूची जोडी पाहण्यात आलेली नसली तरी अशी जोडी ऐकण्यात नक्की असते. किमान चित्रपटातून तरी अशा जन्मजात शत्रुत्वाविषयी पाहिलेले असते. माणसासारखा माणूस असला व दोन्ही बाजूला सारखीच माणसे असली, तरी त्यांचे एकमेकांशी का जमत नाही? ते एकमेकांच्या विरुद्ध का होतात? अर्थात, हा विषय मानसशास्त्राचा आहे. तूर्त यावर जास्त चर्चा न करता एकमेकांचे विचार जमत नसल्याने त्यांच्यात शत्रुत्व निर्माण होते असे म्हणून थांबावे लागेल.

विचारांचे एवढे महत्त्व काय असे वाटू शकते, पण विचारांच्या मागून येतो आचार (आचरण). एक जाणार पूर्वेला, दुसरा जाणार पश्‍चिमेला. एक म्हणतो, मी म्हणतो तेच खरे; दुसराही म्हणतो, माझेच खरे. अशी दोन वेगवेगळी टोके तयार झाली, की त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित होतात. दोन वस्तू एकत्र केल्या तर त्या एकमेकांत एवढ्या मिसळून जातात, की त्या नजरेला वेगवेगळ्या दिसत नाहीत आणि त्या कुठल्याही प्रकारे परत वेगळ्या करता येत नाही, त्यांचा संयोग होतो. पण काही वस्तू मिसळल्या तरी पुन्हा वेगळ्या करता येतात, पण एका विशिष्ट कालापुरता तरी त्यांच्यात संवाद राहतो.

काही वस्तू दुसऱ्या वस्तूवर परिणाम करतात (उदा., एखाद्या खाण्याच्या पदार्थाची चव वाढते, एखाद्या पदार्थाचे सौंदर्य वाढते). काही वेळा दोन पदार्थ एकत्र केले, की त्यांच्यात धुराचे नाते असल्याने त्यांच्यात धुसफूस चालू राहते. दोन पदार्थांमध्ये अग्नीचे नाते असले तर ते दोन्ही पदार्थ एकमेकाला जाळतात, त्यातील एक पदार्थ बलवान असला तर तो दुसऱ्याला जाळतो. हे दोन पदार्थ भांडत असले तर कधी कधी स्फोट होऊन जगाचे नुकसान होते.

अशाच प्रकारे मनुष्याच्या वाढीसाठी तसेच मनुष्याचे जीवन धारण करण्यासाठी असलेल्या अन्नपदार्थांतही मैत्री किंवा विरोध असू शकतो. दुधात लिंबू पिळले, पिळले कशाला सरबत केल्यावर तोच लिंबाचा हात दुधाच्या पातेल्याला लागला तरी दूध फाटते. दूध व लिंबू यांचे एकमेकांशी मुळीच पटत नाही. त्यामुळे मनुष्याच्या आहारात येणाऱ्या वस्तूंवर बराच विचार करणे आवश्‍यक असते. त्यातून शास्त्र तयार होते विरोधी आहाराचे. एखादी वस्तू सेवन केल्यावर लगेच त्या वस्तूच्या विरोधात असलेली वस्तू खाणे ही गोष्ट आरोग्यासाठी अहितकारक ठरते. त्यातून जुलाब होणे, उलट्या होणे, ताप येणे, पोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. विरोधी अन्न खाल्ल्याने त्रास झाला नाही, तरी असे अन्न बराच काळ सेवन केल्यास खाल्ल्यावर शरीराला ताकद मिळत नाही व शरीर उतरायला लागते. अशा वेळी मी दोन वेळा जेवतो आहे तरी माझे वजन का उतरत आहे, असे संबंधित व्यक्‍तीला वाटत राहते. विरोधी अन्न सेवन केल्यास नेहमीच वजन कमी होते असे नाही, तर त्या पदार्थांच्या गुणदोषानुसार वजन वाढतेही. असा लठ्ठपणा कमी करणे अवघड होऊन बसते. तेव्हा आयुर्वेदात आहाराचे एक शास्त्र आहे व त्यात विरोधी आहार समजावलेला आहे. याचे काही ठोबळ नियम केलेले आहेत.

प्रत्येक वेळी दोन वस्तू एकमेकाला विरोधीच असतील असे नाही. कधी कधी प्रकृतीनुसार त्यांचे स्वरूप बदलूही शकते. ज्या वस्तू काहींना त्रास देणार नाहीत, पण त्याच वस्तू वात प्रकृतीच्या माणसाने खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. तेव्हा वात, पित्त, कफ या गोष्टी सांभाळून आहाराची योजना करावी लागते व त्यातही विरोधी अन्नाचा विचार करावा लागतो. तूप व मध या दोन गोष्ट समप्रमाणात घेतल्यास एकमेकाला विरोध करतात, पण सम प्रमाण म्हणजे काय? दोघांचा चिकटपणा (घनता) वेगळा असल्यामुळे एक चमचा पातळ तूप व एक चमचा मध यांचे वजन कधीच सम होणार नाही.

पचनशक्‍ती मंदावलेली असेल तेव्हा घेतलेल्या जड आहाराचे (हा विरोधी नसला तरी) पचन न झाल्यामुळे चरबी वाढू शकते, आमदोष वाढू शकतो किंवा इतर रोग होऊ शकतात. बागेत एका झाडावर पडलेल्या किडीमुळे दुसऱ्या झाडाचे नुकसान होऊ शकते तसाच विचार आहाराविषयीही करावा लागतो. एकूण विरुद्ध आहार हा टाळायलाच हवा. लहान मुलांच्या बाबतीत तर याबद्दल अधिकच लक्ष ठेवावे लागते, कारण त्यांची पचनशक्‍ती कमजोर असते व मन सैरभैर धावणारे असते म्हणजे लहान मुलांची मागणी व आवड क्षणोक्षणी बदलत असते. म्हणून त्यांना विरोधी अन्न दिले जाणार नाही याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते.

विरोधी अन्नाचा विचार करताना कचवट राहिलेले किंवा जळलेले अन्न याचाही विचार करावा लागेल. तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून एकीकडे डाळ शिजायला लावून दुसरीकडे इतर कामे करण्याच्या नादात डाळीतील पाणी कमी होऊन ती जळते. अशी डाळ खाण्यानेही पचनाला त्रास होऊ शकतो. म्हणजे डाळ व तांदूळ हे विरोधी अन्न नव्हे, पण डाळ जळली असली तर ती खाणे हे आरोग्यासाठी अहितकारक असते. कच्च्या पोळ्या, अर्धवट लागलेले दही, कचवट फळे हे सगळे विरोधी आहारात तपासून घ्यावे लागेल.

मनुष्याला सगळ्यात अधिक भीती असते काळाची. काळ हा बहुतेक वेळा आहाराच्या बाबतीत विरोधी होऊ शकतो. काही गोष्टी सकाळी खाणे हे विरोधी आहारात मोडत असेल, तर काही गोष्टी रात्री खाण्याने त्या विरोधी आहारात मोडत असतील. सकाळी सकाळी फळे किंवा फळांचा रस घेणे हे याचेच उदाहरण आहे. तसेच ऋतुमानाचेही असते. ऋतुमान हाही एक काळच आहे.

पहिला पाऊस पडल्यावर आंबे खाणे हे विरोधी आहारातच येते. आंब्याचा रस साठविण्यासाठी काही रसायने टाकलेली असल्यास तीही रस पचविताना विरोधी अन्नाचेच काम करतात. बाजारातून विकत घेतलेल्या तयार अन्नात कुरकुरीत होण्यासाठी, टिकण्यासाठी, रंग चांगला यावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची कृत्रिम रसायने टाकली जातात व बहुतेक वेळा मूळ अन्नाला विरोधी अन्न म्हणून काम करतात. म्हणून अशा प्रकारचे तयार अन्न खाणे आरोग्यासाठी अहितकारक असते. अन्नाशी असलेला विरोध, आहारातील पदार्थांचा एकमेकांशी असलेला विरोध तपासून घेऊन त्यानुसार आहारात वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.