प्रश्न : मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?
सद्गुरू : तुम्ही केवळ एक चांगली व्यक्ती असणे पुरेसे नाही. तुम्हाला या जगात रहायचे असेल, तर तुम्ही सक्षम असणेसुद्धा गरजेचे आहे. सर्वप्रथम तुम्ही चांगली व्यक्ती आहात, असे तुम्हाला कशामुळे वाटते? तुमच्या अवतीभोवती असणारी दहा माणसे काही ना काही कारणास्तव चांगली नाहीत, आणि त्यांच्या तुलनेत तुम्ही अधिक चांगले आहात, असा निष्कर्ष तुम्ही काढत आहात. तुम्ही या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात, असा निष्कर्ष जर तुम्ही काढला असेल, तर त्याचा अर्थ तुमच्या मनात, या पृथ्वीतलावर इतर कोणीही व्यक्ती चांगली नाही, तुम्हीच ती एकमेव व्यक्ती आहात, अशी भावना आहे.
तुम्ही चांगले आहात याचा जितका अधिक विचार तुम्ही कराल, तितके अधिक इतर कोणीही चांगले नाही, असे तुम्हाला वाटू लागेल. जर कोणीही चांगले नसेल, तर तो नैतिकतेचा प्रश्न नसून, मूर्खपणाचा आहे. इतर कोणीही चांगले नाही, असा विचार करायची सुरुवात करणे हे मानसिक विकृतीचे पहिले लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही चांगली व्यक्ती असण्याची आवश्यकता नाही. तुमच्या आयुष्यात, तुमचे आंतरिक स्वरूप जर शांत, प्रेमळ आणि आनंदी असेल, तर तेवढे पुरेसे आहे.
चांगले ‘म्हणवून घेणारी’ काही लोकं साधं हसूसुद्धा शकत नाहीत. त्यांचा स्वभावच तसा बनलेला असतो. का माहिती आहे का तुम्हाला? कारण त्या खूप चांगल्या व्यक्ती असतात. अशा चांगुलपणाचा काय उपयोग आहे? तर, आता अंतर्मनात डोकावून, मनुष्याचे खरे कल्याण कसे साधायचे ते शोधण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या अनुभवामधून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल, की तुम्हाला खरे कल्याण हे केवळ तुम्ही तुमच्या अंतरंगात बदल घडवून आणले तरच प्राप्त होईल.
तुमच्या जीवनाची गुणवत्ता, तुमची वेशभूषा, तुमची शैक्षणिक पात्रता, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, किंवा बँकेत किती रक्कम तुम्ही साठवली आहे यावरून निश्चित केली जात नाही. या क्षणी, केवळ अंतर्मनातून तुम्ही किती शांत आणि आनंदी आहात, यावरून तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. तुमच्या अंतर्मनात परिवर्तन घडून आलं तरच तुम्हाला खरे कल्याण प्राप्त होईल.
योग आणि ध्यान या विज्ञानाच्या अशा बाजू आहेत, ज्या तुमचे अंतर्मन हाताळतात, ज्यामध्ये अंतर्मनात योग्य वातावरण निर्मिती करण्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं, ज्यामुळे तुम्ही एक आनंदी आणि शांत जीवन जगू शकता. त्यामुळेच प्राथमिक गोष्ट ही आहे, की ‘मनुष्यजातीचे कल्याण’ हे जर तुमचं कार्यक्षेत्र असेल, तर तुम्ही स्वतःकडे आधी लक्ष्य द्या. तरच तुम्ही मानवतेच्या कल्याणासाठी काहीतरी ठोस आणि स्थायी कामगिरी बजावू शकाल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.