करा हो नियमित योगासन

yogabhyasi mandal.jpg
yogabhyasi mandal.jpg
Updated on

रामनगर द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर जर्नादन स्वामी मार्ग या मुख्य रस्त्यावर डाव्या हाताला एक प्रशस्त चार मजली इमारत आपले लक्ष वेधून घेते. ही इमारत आहे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगशिक्षणाचे असिधाराव्रत घेतलेल्या जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळाची. या भव्य इमारतीत प्रवेश करतानाच इथले पावित्र्य मनावर गारुड करते. इमारतीत पहिल्या मजल्यावर जर्नादन स्वामींचे समाधीमंदिर आहे. उजव्या बाजुला शेणाने स्वच्छ सारवलेला रस्ता. तिथल्या वृक्षांनाही यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही अष्टांग योगातील नावे दिलेली. समोर तुळशी वृंदावन, दिवा आणि रांगोळी. आत शिरतानाच ओंकाराचे धीरगंभीर स्वर कानावर पडतात. स्वामीजींच्या पवित्र समाधी समोर योगसाधक साधना करताना दिसतात.
1949 सालचे नागपूर. फारशी वर्दळ नसलेले. रामनगर हा तर अगदी विरळ लोकवस्तीचा भाग. अशावेळी भगवी वस्त्रे परीधान केलेले, पायात लाकडी खडावा, तेजस्वी डोळे आणि आजान बाहु असे संन्यासी कोकणातल्या सुदूर खेड्यातून भारतभ्रमंती करीत इथे आले. ते होते जर्नादन स्वामी. स्वामीजींनी समाजाच्या उत्थानासाठी योगासनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नागपूर नगरीची निवड केली. अयाचित व्रत घेतलेल्या स्वामीजींनी तेव्हा घरोघरी जाऊन, शाळाशाळांमधून भारताच्या प्राचीन अशा योगसाधनेच्या वारशाचा प्रचार आणि प्रसार केला, तोही निशुल्क. 1949 ते 1978 म्हणजे स्वामीजी समाधिस्थ होईपर्यंत अशी 29 वर्षे स्वामीजींचे वास्तव्य या आश्रमात होते. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या याच परीसरात योगाभ्यासाचे व्रत आजही सुरू आहे अखंड, अविरत.
प्रचंड थंडी असो, धुवॉंधार पाऊस असो की कडकडीत उन्हाळा. वर्षाचे बाराही महिने सकाळी 5 वाजून 59 मिनटं आणि 60 सेकंदांनी इथे प्रार्थनेचे स्वर घुमू लागतात आणि योगाभ्यास सुरू होतो. सामाजिक बांधिलकी जपणारे आणि स्वामीजींवर श्रद्धा असलेले इथले योगशिक्षक कुठल्याही मानधनाशिवाय वर्षानुवर्षे इथे योगविद्या शिकवित आहेत. स्वामीजींच्या प्रेरणेतून नागपुरातील इतर 105 ठिकाणीही योगाभ्यासी मंडळाचे असेच निशुल्क वर्ग सुरू आहेत.
योगाभ्यासी मंडळात निरोगत्वासाठी वर्ग चालतात,तसेच विविध आजारांवरही योगाद्वारे निशुल्क उपचार केले जातात. रक्‍तदाब, मधुमेह अशा आजारांसाठी विशेष शिबीरांचेही आयोजन केले जाते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची चमू कार्यरत असते. नवीन पिढीला योगाचे आकर्षण वाटावे आणि त्यांनी योगजीवनशैली अंगिकारावी यासाठी योगसंस्कार शिबीर, बुद्धीविकास शिबीर अशी शिबीरे घेतली जातात. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सांघिक योगासन स्पर्धाही घेतल्या जातात. येत्या 18 जानेवारी 2020 रोजी नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये 30 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दरवर्षी 21 जून या जागतिक योग दिनी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने सांघिक योगासनांचे आयोजन करण्यात येते, त्यामध्ये 25 हजार योगसाधक सहभागी होत असतात. दर तीन वर्षांनी निवासी योग संमेलनाचे आयोजन योगाभ्यासी मंडळ करीत असते, त्यावेळी साडे तीन-चार हजार योगसाधक उपस्थित असतात.
योगाचा प्रचार करण्याच्या दृष्टीने योगप्रकाश हे मासिक योगाभ्यासी मंडळातर्फे प्रकाशित केले जाते. दहा हजार साधक याचे सदस्य असूुन नियमितपणे हा अंक प्रकाशित होतो, आणि याचे संपादक मंडळ वर्षानुवर्षे केवळ सेवा म्हणून निशुल्क कार्य करीत आहे. योगप्रकाश दिवाळीत दरवर्षी योगजीवनशैली विशेषांकही प्रकाशित करीत असते.
जर्नादन स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या जागेवर अगदी अलिकडे ही भव्य वास्तू उभी राहिली आहे ती जनतेने स्वखुशीने उभारलेल्या निधीतून. अयाचित व्रत अंगिकारलेल्या संन्यासी स्वामींचा वारसा सांगणारे इथले योगसाधक कधीच कोणाकडूनही पैचीही अपेक्षा करीत नाहीत. स्वार्थाने गजबजलेल्या या जगात निस्वार्थ सेवेचा हा यज्ञ अव्याहतपणे सुरू आहे.
योगाभ्यासी मंडळ हे एक कुटुंब आहे. इथे सगळे भारतीय सणउत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये जर्नादन स्वामींची पुण्यतिथी, जयंती आणि गुरूपौर्णिमा हे विशेष आहेत. स्वामीजींच्या पुण्यतिथी दिनी सांघिक योगासने करून स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण केली जाते. स्वामीजींच्या पादुकांची पालखी निघते. स्वामीजींच्या जयंतीनिमित्त तीन दिवसांच्या प्रवचनमालेचे आयोजन केले जाते. याशिवाय दीपोत्सव, गुढीपाडवा, श्रीकृष्ण जयंती, महाशिवरात्री असे विविध सण अनोख्या पद्धतीने साजरे केले जातात.
पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या जीवनातील शांतता नष्ट झाली आहे. त्याचे परीणाम त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही दिसतात. मनस्वास्थ्य हरवलेल्या माणसांच्या गर्दीत जर्नादन स्वामी योगाभ्यासी मंडळाची ही वास्तू आणि इथले योगसाधक समाजाचे शारीर आणि मनस्वास्थ्य प्रदान करण्यासाठी झटत आहे.
मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण
करा हो नियमित योगासन
योगाभ्यासी मंडळाचे हे सांघिक गीत मानवाचा परमेश्‍वर होण्याचा संदेश देणारे आहे आणि स्वामीजींच्या कृपेने माणसातला परमेश्‍वर जागृत करण्याचाच इथल्या योगसाधकांचा प्रयत्न आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.