इनर इंजिनिअरिंग : चाखा चव जीवनाची

आज बहुतेक लोक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत, की अध्यात्म अशा लोकांसाठी आहे, ज्यांना जीवनात काहीच रस नाही.
Sadguru
Sadgurusakal
Updated on

अनासक्तीच्या तत्त्वज्ञानावर आज अशा लोकांची मालकी आहे, ज्यांनी जीवनाची पूर्णतः गैरसमजूत करून घेतली आहे; आणि अशा लोकांमुळे आज जगात अध्यात्माविषयी इतका प्रचंड तिटकारा आहे. आज बहुतेक लोक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत, की अध्यात्म अशा लोकांसाठी आहे, ज्यांना जीवनात काहीच रस नाही.

अध्यात्म म्हणजे जीवनाविषयीची तुमची आवड इतकी खोलवर गेली आहे, की तुम्हाला जीवनाबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. म्हणूनच अध्यात्म. जीवनाबद्दलचा तुमचा सहभाग इतका सखोल होतो, की तुम्हाला केवळ जीवनाचे भौतिक स्वरूपच नव्हे, तर सर्वांगीण स्वरूप जाणून घ्यायचे आहे, यालाच म्हणतात अध्यात्म. जे लोक जीवन टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, ते कसे काय आध्यात्मिक असू शकतील? प्रश्नच नाही, अशा व्यक्तीला आध्यात्मिक होण्याची संधीच नाही, कारण अध्यात्माला प्रत्येक गोष्टीशी परिपूर्ण आणि संपूर्ण सहभागाची आवश्यकता असते; नाहीतर कोणतीच आध्यात्मिक शक्यता नाही.

अनासक्तीच्या तत्त्वज्ञानाने केवळ जीवनाला गुदमरून टाकले नाही, तर पृथ्वीवरील सर्व आध्यात्मिक शक्यताच नष्ट केल्या आहेत, कारण बहुतेक लोकांमध्ये अध्यात्माबद्दल तिटकारा निर्माण झाला आहे. बऱ्याच लोकांची आज सर्वसामान्य अशी समज आहे, की तुम्हाला आध्यात्मिक व्हायचे असल्यास तुम्ही पोटभर जेवू नये, व्यवस्थित कपडे घालू नयेत, उत्तमरीत्या जगू नये, तुमचा गुदमर झाला असला पाहिजे - किमान तुम्ही गुदमरलेले दिसले पाहिजे. जर तुम्ही हसता, खेळता आणि जीवन मजेत जगत असाल, तर तुम्हाला आध्यात्मिक मानले जात नाही. तुमचा चेहरा शेळीसारखा असला पाहिजे, जो कधीच हसलेला नाही; तरच तुम्हाला आध्यात्मिक मानले जाते. हा सगळा गैरसमज अनासक्तीच्या तत्त्वज्ञानामुळे निर्माण झालेला आहे.

तत्त्वज्ञान तुम्हाला हवे तसे घडवले जाऊ शकते, परंतु ते काही जीवन नाही. जी गोष्ट जीवनाला टाळत आहे त्यात तुम्हाला रस का आहे? तुम्ही इथे जीवन जगण्यासाठी आला आहात, जीवन टाळायला नाही. एवढेच आहे, की आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे तुम्हाला जीवनाच्या पृष्ठभागावर हरवून जायचे नाही, तुम्हाला जीवनाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचायचे आहे. आणि ते काही अलिप्त होऊन करता येणार नाही. हे फक्त सहभागाने येते. तुमचा सहभाग आता ज्या पातळीचा आहे त्यापेक्षा खूप खोल व्हायला हवा. तरच तुम्हाला आध्यात्मिक प्रक्रिया कळेल - अलिप्त राहून नाही. जीवनाला टाळून कोणतीही आध्यात्मिक प्रक्रिया होऊ शकत नाही.

‘‘मृत असणे सोपे आहे, जीवन कठीण आहे. म्हणून मला काहीही होऊ नये.’’ ह्या गैरसमजुतीतून अनासक्तीचे तत्त्वज्ञान आले आहे. लोक येतात आणि मला विचारतात, ‘‘सद्गुरु कृपा करून मला आशीर्वाद द्या: मला काहीही होऊ नये.’’ हा कसला आशीर्वाद आहे? माझा आशीर्वाद असा आहे, तुमच्यासोबत सर्व काही घडू दे. जीवन तुमच्यासाठी घडले पाहिजे की घडू नये? जीवन हे तुमच्या बाबतीत घडले पाहिजे. म्हणून सर्व काही तुमच्या बाबतीत घडू द्या. जर तुम्ही अलिप्त असाल तरच तुमच्याबाबतीत काहीच घडणार नाही. जरी सर्वकाही घडत असले तरी, जर तुम्ही अलिप्त असाल तर तुम्हाला त्याची चव कळणार नाही. तुम्ही सहभागी असले पाहिजे, तरच तुम्हाला जीवनाची चव कळेल. अन्यथा नाही कळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.