मनाचे स्नान 

ravishankar
ravishankar
Updated on

तुम्ही चांगले कपडे घालून बाहेर जाता. तुमचे कपडे कधी नवीन असतात, त्यांना इस्त्री करून तुम्ही ते घालता आणि बाहेर पडता. मग काय होते? ते मळतात. मग तुम्हाला ते धुवावे लागतात. बरोबर? 

त्याचप्रमाणे तुम्ही स्नान करता, शरीरावर अत्तराचे फवारे मारता. तो सुवास काही काळच दरवळत राहतो, परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्नान करावे लागते. समजा तुम्ही लागोपाठ तीन दिवस स्नानच केले नाहीत तर तिसऱ्या दिवशी तुमच्याजवळ कोणीही फिरकणार नाही. अशावेळी तुम्ही म्हणालात की ‘अरे, तीनच दिवसांपूर्वी मी स्नान केले होते, आता परत करायला लागणार म्हणजे तीन दिवसांपूर्वी केलेले स्नान फुकट गेले.’ असे म्हणून चालणार नाही. असा कोणी विचार करायला लागला तर त्याला तुम्ही वेडा ठरवाल. आपल्या मनाचेही असेच असते! एकदा स्नान केल्यावर दुसऱ्या दिवशी आपण स्नान करतो. कधी कधी संध्याकाळीही करतो. कडक उन्हाळ्यात दिवसातून तीनवेळा स्नान करतो. हिवाळ्याच्या दिवसात मात्र शक्यतो दुसऱ्या दिवशीच आपण स्नान करतो.शरीर मळल्यावर  आणि तेलकट झाल्यावरच स्नान करायचे असे मात्र कोणी म्हणत नाही. किंवा स्नानासाठी शरीराचा वास घेत कोणी बसत नाही. शरीराला घाण वास येत असो अथवा नसो, शरीर मळलेले असो अथवा नसो, आपण रोज सकाळी स्नान करतोच. बरोबर? त्याचप्रमाणे अंगावर कपडे घातल्यावर त्याचा रंग जाईपर्यंत किंवा ते पूर्ण मळेपर्यंत आपण वापरत नाही. तसेच दुसऱ्या दिवशी ते धुवायला टाकतो. कपड्यावर पडलेले थोडेसे डाग आपल्याला दिसले तरी आपण ते धुवायला टाकतो. कपड्यांवर डाग पडणे अथवा न पडणे हे आपल्या हातात असते का? कपड्यांना डाग पडणे स्वाभाविक असते. 

त्याचप्रमाणे शरीर मळणे हे स्वाभाविक असते. तुमच्या हाताला कसला तरी रंग लागला, किंवा डांबर चिकटले किंवा तुमचा हात चिखलाने माखला आहे अशी कल्पना करा. असे झाले तर, ‘अरेरे माझा हात खराब झाला आहे’ म्हणून तुम्ही रडत बसणार आहात का? उलट असे झाले तर तुम्ही लगेच उठून साबणाने हात स्वच्छ धुऊन टाकाल. इतके करूनही तो रंग किंवा मळ हाताला चिकटून बसला तर तो जाईपर्यंत तुम्ही हात कशाने तरी घासत राहाल. त्यात तासभर तुमचा वेळ वाया गेला तरी हात स्वच्छ होईपर्यंत तुम्ही थांबणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समजा कोळशामुळे किंवा एखाद्या पक्क्या रंगामुळे तुमच्या हातावर डाग पडले आणि ते सहजपणे धुतले जाणे शक्य नसले, तरी पुढचे दोन तीन दिवस ते डाग घालविण्याचे प्रयत्न तुम्ही शांतपणे सतत करत राहाल. मनाचे तसेच आहे. मन कधी आनंदात असते तर कधी दु:खात असते. याच्याच जोडीला इतरांचा आनंद किंवा दु:ख तुमच्या मनावर येऊन साठते. इतरांच्या आनंदाचा किंवा दु:खाचा परिणाम तुमच्या मनावर होतो. ही सुद्धा एक प्रकारची मनावर साठणारी धूळच आहे. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही स्वच्छ कपडे घालून बाहेर पडलेले असता मात्र बाजूने जाणारी रिक्षा तुमच्या अंगावर डबक्यात साचलेला चिखल उडवून जाते तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचे कपडे चिखलाने माखतात. अशावेळी त्या रिक्षा ड्रायव्हरवर तावातावाने ओरडण्यात आणि त्याच्याशी भांडण्यात काहीच अर्थ नसतो. तुम्ही तुमचे कपडे खराब केलेले नसले तरी ते दुसऱ्याने केलेले असतात म्हणून तुम्ही ते तसेच ठेवता का? उलट घरी येऊन ते परत स्वच्छ धुता. आपले मनही असेच आहे. पुढील लेखात आपण मनावर नियंत्रण कसे मिळवायचे ते पाहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.