पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पुन्हा कसली कंबर 

File photo
File photo
Updated on

नांदेड : यावर्षी वेळेवर रोहिण्या बरसल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून घेतली आहेत. मृगाच्या सुरवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लागवडीलाही सुरवात केली आहे. यात सध्या हळद लागवड जोमात सुरू आहे, तर काही बागायतदार शेतकरी कापूस, मूग, उडदाची लागवड करताना दिसून येत आहेत. 

मागील चार-पाच वर्षांचा काळ पाहता, शेतकऱ्यांसाठी अतिशय संकटाचा ठरला आहे. या संकटांना तोंड देत असतानाच यावर्षी पावसाळ्याच्या मुहूर्तावरच पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उरलेले अवसान सावरत आशेचे स्वप्न पाहत पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मागील काळावर पडदा टाकत पुन्हा एकादा मशागतीची कामे उरकून पेरणीसाठी सज्ज झाला आहे.

योजनाही अडकली कोरोनाच्या कचाट्यात
कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी अशा अनेक संकटांनी शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांचेही अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या दरीत कोसळला असून तो कर्जबाजारी होत चालला आहे. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा जोतिबा कर्जमाफी योजना राबविली. मात्र, तीही कोरोनाच्या कचाट्यात अडकली असून लॉकडाउनमुळे ती बंद अवस्थेतच असल्यागत आहे. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना पीकर्जासाठी अडचणी येत असून खासगी सावकारांच्या पायरीला जाण्याची वेळ येत आहे. 

अतिवृष्टीमुळे उत्पादन कमीच
मागील वर्षी ऐन हंगामात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मूग, उडीद हे पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेच नाही. त्यात सायाबीन कसेबसे झाले मात्र, तेही डागीच. यामुळे खरीप उत्पादनात अतिशय घसरण झाली. झालेला मालही चांगल्या प्रतीचा नसल्यामुळे त्याला भावही अतिशय कमी मिळाला. त्याचबरोबर माऊचर, कट्टीच्या नावाखाली खासगी सावकारांनीही शेतकऱ्यांना चांगलेच लुटले.

लॉकडाउन शेतकऱ्यांच्या मुळावर
मागील तीन महिन्यांपासून कोरोना या विषाणूजन्य आजाराने देशात थैमान माजविले आहे. त्यामुळे देश लॉकडाउन करण्याची वेळ आली. मात्र, याचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. नैसर्गिक संकटे झेलत शेतातून पिकविलेल्या थोड्याफार पिकांनाही बाजारपेठा बंद असल्याने योग्य भाव मिळाला नाही. शासनाने चालवलेले हमीभाव खरेदी केंद्रही कधी चालू, तर कधी बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसाच पडून आहे. फुलशेतीचेही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे रक्ताचे पाणी करून बहरलेल्या शेतीवर शेतकऱ्यांना नाईलाजाने नांगर फिरवावा लागला.

या वर्षी पावसाला सुरवात चांगली झाली आहे. त्यामुळे हळद लागवडीला सुरवात केली. मागीलवर्षी तर कापूस, सोयाबीनचे काहीच उत्पन्न झाले नाही. बाजारात भावही चांगला नाही. यावर्षी तरी निसर्गाने चांगली साथ द्यावी. शासनानेही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, हीच अपेक्षा.
- गोविंदराव भुजंगा चवंडकर, शेतकरी वाका, ता. लोहा    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.