Nanded Loksabha Constituency : मराठवाड्याच्या विकासाची जबाबदारी भाजपची, फडणवीस ; नांदेडला प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरला अर्ज

मराठवाडा, विदर्भाच्या विकासाची जबाबदारी भाजप आणि महायुतीची आहे. खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली दरबारी या भागाच्या विकासाचाच प्रयत्न करतील.
Nanded Loksabha Constituency
Nanded Loksabha Constituency sakal
Updated on

नांदेड : मराठवाडा, विदर्भाच्या विकासाची जबाबदारी भाजप आणि महायुतीची आहे. खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली दरबारी या भागाच्या विकासाचाच प्रयत्न करतील. मराठवाड्यासह नांदेडच्या विकासाच्या अटीवरच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मराठवाडा, विदर्भाचा विकास हे भाजपचे स्वप्न आहे, ते पूर्णत्वास जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर हिंगोली गेट भागातील मैदानावर सभा झाली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. गत निवडणुकीत चिखलीकरांच्या विरोधात अशोक चव्हाण हे बलाढ्य उमेदवार होते. परंतु, जनतेने चिखलीकरांना निवडून दिले. आता अशोकराव भाजपमध्ये आहेत. त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी अनेक दिवसांपासून आमचे प्रयत्न सुरू होते. अशोक चव्हाण यांना राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यामुळे चिखलीकरांना बूस्टर डोस मिळाला आहे. या निवडणुकीत त्यांना गत निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. अजित गोपछडे, भास्करराव पाटील खतगावकर, लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, डॉ. तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर, अमर राजूरकर, संजय कौडगे, सूर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर, ओमप्रकाश पोकर्णा, शिवसेनेचे आनंद बोंढारकर व उमेश मुंडे आदी उपस्थित होते.

भाजपचे मिरवणुकीने शक्तिप्रदर्शन

चिखलीकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जुना मोंढा ते जल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड व आमदार बालाजी कल्याणकर आदी सहभागी होते.

मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांचा अजेंडा तयार आहे. पंतप्रधानांनी दिलेली गॅरंटी महत्त्वाची असून, मी ज्या पक्षात काम करतो ते शेवटपर्यंत इमानदारीने करतो. विरोधी पक्षाकडे कुठल्याच विकासाचा अजेंडा नाही. यामुळे मला विरोध हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे.

- अशोक चव्हाण, खासदार

राजकारणात अशोकराव व मी एकत्र येऊ, असे कधीच वाटले नाही. मागील पंचवीस वर्षांपासून आमच्या दोघांत संघर्ष होता. परंतु, तो आता मावळला आहे. अशोकरावांच्या नेतृत्वात पुन्हा काम करण्यास तयार असून, हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शक्य झाल्याचे उमेदवार चिखलीकर यांनी सांगितले.

प्रताप पाटील चिखलीकर, उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.