नांदेड : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत विविध कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, या सुविधा अंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करुन एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
अर्ज स्वीकृती प्रक्रिया सन २०२१- २२ करिता सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी २०२०- २१ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला, परंतु त्यांची कोणतीही योजनेसाठी निवड झाली नाही ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबीमध्ये बदल करु शकतील. असे अर्ज २०२१- २२ करिता ग्राह्य धरले जाणार आहेत. याकरिता शेतकऱ्यांना पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही. २०२१-२२ करिता वरील अर्जातील ज्या बाबीकरीता अर्ज केले आहेत, या बाबीचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करण्यात येणार आहे. या योजनेव्दारे एका अर्जाद्वारे सर्वच लाभ देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी स्वतः चा मोबाईल संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतील संग्राम केंद्र आदीच्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्यां सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी. सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुनच शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यासाठी यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. या कामासाठी लाभार्थ्यांनी जवळील सामुहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कृषी विभागाची संपर्क करावे असे आवाहन रविशंकर चलवदे यांनी केले आहे
फलोत्पादन योजना अंतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिकापालन, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड, डाळिंब लागवड, मोसंबी लागवड, पेरु लागवड, सिताफळ लागवड, तसेच इतर फळबाग लागवड योजना, शेततळ्यातील पन्नी, सामायिक शेततळे तसेच कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पावर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्य अवजारे, चलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, वखर आदी उपकरणासाठी अर्ज करता येइल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.