नांदेड - सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुकानांना परवानगी नसताना चालू करणे, दुपारी दोन नंतर दुकान चालू ठेवणे या व इतर नियमांचे उल्लंघन करणे काही दुकानदारांना भोवले आहे. त्यामुळे नांदेड महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून पथकाने सहा दुकानांवर मंगळवारी (ता. १९) दंडात्मक कारवाई केली आहे.
नांदेडला कोरोनाची संख्या वाढत चालल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून काही दुकानांना सोमवारपासून (ता. १८) सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी त्या त्या ठिकाणी पथकेही स्थापन करण्यात आली आहे. नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी देखील पथकांची स्थापन केली आहे. या पथकाद्वारे पाहणी करुन कारवाई करण्यात येत आहे.
सहा दुकानांवर कारवाई
लॉकडाउनमध्ये दुकानांना उघडण्याबाबत दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मंगळवारी दिवसभरात सहा दुकानदारांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील चप्पलच्या एका दुकानदाराने परवानगी नसताना दुकान उघडले. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक दुकानदाराला दंडाचा ‘शॉक’
वजिराबाद भागातील तारासिंग मार्केट येथे एक इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. सदरील दुकान दुपारी दोननंतर सुरू ठेवले होते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने त्यांच्याकडून दंड वसूल केला. कापड दुकानदारालाही दंडाचा फटका बसला असून जुना मोंढा येथे कपड्याचे दुकान असून ते दुकान परवानगी नसताना उघडले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे महापालिकेच्या पथकाने दंड ठोठावला आहे.
हेही वाचलेच पाहिजे - Video ; नांदेड जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग
सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे तीन दुकानांना महागात पडले. या तीन दुकानांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड महापालिकेच्या पथकाने लावला असून तो वसूल करण्यात आला आहे. यामध्ये श्रीनगर येथे गारमेंटसचे दुकान, आयटीआय येथील मोबाईलचे दुकान तर शिवाजीनगर येथील वाईन शॉपचा समावेश असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
या आहेत अटी व शर्ती
दुकाने, प्रतिष्ठांने सुरु करण्यासाठी ठिकाणी उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये कामाच्या ठिकाणी, दुकानात प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, एकावेळेस दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे, मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू, ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतूकीकरण करणे आवश्यक आहे. नेमून दिलेल्या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास तसेच उपाययोजनेचा भंग केल्यास पाच हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदाराकडून आकारण्यात येत आहे. त्यामुळे दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन करु नये, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.